कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोरोना महामारी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ढोलगरवाडी, ता. चंदगड येथे २५ जुलै रोजी नागपंचमी निमित्त होणारा उत्सव, सर्प प्रदर्शन व प्रबोधन कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन चौगुले व उपाध्यक्ष तथा सर्पोद्यान चे कार्यकारी संचालक तानाजी वाघमारे यांनी दिली आहे.
आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी आपले वडील सत्यशोधक सटुपा टक्केकर-वाघमारे यांच्या प्रेरणेतून ६० वर्षांपूर्वी शेतकरी शिक्षण मंडळ स्थापना केले. संस्थेच्या येथील मामासाहेब माध्यमिक शाळेला आपल्या सापांविषयीच्या कार्यातून सर्पोद्यान तथा सर्पशाळा म्हणून मान्यता मिळवून दिली. काही वर्षांपासून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व झू अथोरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेची मान्यता प्राप्त आहे.
ढोलगरवाडी सर्पोद्यान हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तमिळनाडू आदी राज्यातील वैद्यकीय क्षेत्र, वनविभाग, पोलीस, सैन्यदल, सर्प व पर्यावरण अभ्यासक आदींसाठी माहिती स्त्रोत तसेच अभ्यास केंद्र बनले आहे. सर्पोद्यान ची धुरा सर्प विभाग प्रमुख सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी शिक्षक सहकाऱ्यांसह संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे पेलली आहे.
तथापि यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढवल्यामुळे नागपंचमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. सर्प प्रेमी व भाविकांनी यावर्षी ढोलगरवाडीला येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या पंचावन्न वर्षात नागपंचमीनिमित्त होणारा सर्प प्रबोधन कार्यक्रम रद्द झाल्यामुळे सर्प प्रेमींत मात्र नाराजी पसरली आहे.
No comments:
Post a Comment