संगणक प्रशिक्षण संस्थाना आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसिलदारांना निवेदन, लॉकडाऊनमुळे वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाच्या बॅचचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2020

संगणक प्रशिक्षण संस्थाना आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसिलदारांना निवेदन, लॉकडाऊनमुळे वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाच्या बॅचचे नुकसान

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या संगणक प्रशिक्षण संस्थांना आर्थिक मदत मिळावी, याबाबतचे संघटनेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देताना संपत पाटील व अनिकेत मांद्रेकर.
चंदगड / प्रतिनिधी
देशासह महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार गेले सव्वादोन महिने बंद होते. या कालावधीत संगणक प्रशिक्षण देणाऱ्य संस्थांही बंद होत्या. मार्च ते मे या कालावधीत संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. मात्र याच काळात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्व संस्था बंद होत्या. त्यामुळे संगणक संस्थाचालक आर्थिक संकटात साडले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने इतर व्यावसायीकांप्रमाणे मदत करावी अशी मागणी चंदगड तालुका संगणक प्रशिक्षण संस्थांच्या वतीने चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 
कोरोनामुळे २२ मार्चपासून तालुक्यातील सर्व प्रशिक्षण संस्था बंद अवस्थेत आहेत. मार्च ते मे या कालावधीत संगणक प्रशिक्षण संस्थांचा सुगीचा हंगाम असतो. आमचा पूर्ण वर्षातील मोठा व्यवसाय हा याच कालावधीमध्ये होतो. याच वेळेच्या उत्पन्नावर आम्हाला वर्षभराचे आर्थिक नियोजन करावे लागते. कारण मोबाईल आल्यामुळे संगणक प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्यांची संख्या काहीशी रोडावली आहे. विद्यार्थ्यांचा हा सुट्टीचा कालावधी असल्यामुळे सुट्टीत घरी बसण्यापेक्षा विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेतात. हा व्यवसायाचा मुख्य हंगाम वाया गेला आहे. जूनमध्ये पाऊस सुरु होणार आहे. लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढेल याबाबत निश्चित सांगता येत नाही. सव्वादोन महिने आमच्या संस्थया बंद असल्यामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. संस्था बंद असल्या तरी जागेचे भाडे, वीजबिल, टेलिफोन व इंटरनेटचे भाडे हे सुरुच आहे. संगणक व इतर लागणारे साहित्यासाठी बँकाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही सुरूच आहेत. ते देणे सद्यस्थितीत अवघड आहे. त्यामुळे कुटंबाचे आर्थिक ओढाताण व हाल सुरु आहेत. याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने अशा संकटाच्या स्थितीत मानसिक संतुलन बिघडण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे इतर व्यावसायिकांच्याप्रमाणे संगणक प्रशिक्षण संस्थांनाही सरकारच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे. चंदगड तालुका संगणक प्रशिक्षण संस्थांच्या वतीने याबाबतचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे. निवेदनावर चंदगड तालुक्यातील चंदगड तालुक्यातील संगणक प्रशिक्षण संस्थांचालकांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment