तुर्केवाडी बाजारपेठ दोन दिवसासाठी खुली, १६ जुलै ते २० जुलै पुन्हा ५ दिवसाचा लॉकडाऊन - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2020

तुर्केवाडी बाजारपेठ दोन दिवसासाठी खुली, १६ जुलै ते २० जुलै पुन्हा ५ दिवसाचा लॉकडाऊन

तुर्केवाडी बाजारपेठ दोन दिवसासाठी खुली झाल्याने गावात नागरीकांचा वावर दिसत होता. 
सी. एल. वृत्तसेवा, तुर्केवाडी
     आठवड्याभराच्या लॉकडाऊननंतर तुर्केवाडी बाजारपेठ दोन दिवसासाठी खुले करण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा ५ दिवसाचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय ग्राम दक्षता समितीने घेतला आहे.
          दरम्यान, सर्व व्यवहार पुढील दोन दिवस पूर्णवेळ सुरू राहणार असून ग्रामस्थांनी सर्व अत्यावश्यक साहित्य घेऊन ठवावे, त्यानंतर पुन्हा ५ दिवसासाठी लोकडाऊन घोषित करण्यात आल्याचे गावकामगार पोलीस पाटील सौ. माधुरी कांबळे यांनी सांगितले.
         तालुक्यात कोरोना समूह संसर्ग वाढला असून पुढील नियोजन करण्यासाठी सोमवारी तुर्केवाडी ग्राम दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. सदर मिटिंगमध्ये सर्व कोरोना दक्षता समिती सदस्य यांच्या सहमतीने मंगळवार (दि. १४ जुलै) आणि बुधवार (दि. १५ जुलै) या दोन दिवसाच्या कालावधीत सर्व जीवनावश्यक दुकाने पूर्ण वेळेसाठी सुरू राहतील व गुरुवार ते सोमवार या पाच दिवसांच्या कालावधीसाठी सर्व गाव बंद राहील असा निर्णय घेण्यात आला आहे. 
        तसेच व्यवहार करताना सर्व दुकानदारांनी सुरक्षितेचे सर्व नियम पाळून सावधगिरी बाळगावी. सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असून अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेत गाव सुरक्षित ठेवले असून पुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन सरपंच रुद्राप्पा तेली यांनी केले.
        तुर्केवाडी पंचक्रोशीत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रेड झोनमधील नागरिकांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या तुर्केवाडी शाखेत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. तसेच बाहेरगावच्या नागरिकांनी कामाशिवाय बँके परिसरात येऊन कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये असे आवाहन ग्राम दक्षता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
            बातमीदार - महेश बसापुरे, तुर्केवाडी प्रतिनिधी


No comments:

Post a Comment