सीमाभागातील मराठी बांधवांसाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र शिनोळी येथे होणार - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

सीमाभागातील मराठी बांधवांसाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र शिनोळी येथे होणार - आमदार राजेश पाटील

शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे सिमा भागातील महाविद्यालयासंदर्भात चर्चा करताना उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , खासदार मंडलिक, आमदार राजेश पाटील.
तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
सीमाभागातील विद्यार्थ्यांवर नेहमी अन्याय होत आला आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी येथील विद्यार्थी नेहमी संघर्षाला सामोरे जातो. त्याच्यांवर नेहमी भाषिक जुलूम होत आला आहे. भाषिक कुचंबना प्रगतीतील अडथळा ठरू शकतो. म्हणून त्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावे आणि कॅम्पस सिलेक्शन मधून नोकरीची संधी मिळावी यासाठी सीमाभागालगत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे अशी मागणी आम्ही केली होती त्यानुसार सिमा भागात शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र उभा राहत असल्याची माहीती आमदार राजेश पाटील यानी दिली .
ते पुढे बोलताना म्हणाले ,  दि. १९ जुलै, २०२० रोजी शिवाजी विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्यासोबत बैठक पार पडली. सीमाभागातील जनतेने मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान आणि जागर सन्मानाने तेवत ठेवला आहे. सीमावासी बांधवांना अशा शैक्षणिक संकुलाची संकल्पना  शरद पवार,  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मनात आहे.त्या संकल्पनेला आता मूर्त रूप मिळते आहे. या सर्वांची सीमाभागातील लोकांप्रती आदराची आणि ममत्त्वाची भावना आहे. आपण महाराष्ट्रातील लोक सीमाभागातील जनतेचे देणे लागतो, अशी भावना त्यांची आहे. त्या भावनेचा साजेशे असे शैक्षणिक संकूल शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या रूपाने उभे राहाते आहे. यामुळे मराठी भाषेचा जागर सीमाभागात कायम राहील.
तसेच येथे आर्ट,कॉमर्स व सायन्स हे पारंपरिक शिक्षण देणे हे उद्दिष्ट न ठेवता व्यापक विचार केला आहे. या उपकेंद्रातू शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम चालू करणार आहोत. त्यामध्ये नॅनो सायन्स, फुड टेक्नॉलॉजी, एम. एस, डब्ल्यू , एम. बी.ए  यांचा समावेश आहे. शिवाय मराठी भाषेतून लेखन वाढावे यासाठी पटकथा लेखन , रूपांतर, अनुवाद, जाहिरातलेखन , पत्रकारिता, अर्थशास्त्र ,पर्यावरण, मानसशास्त्र हे विषय मराठीतून शिकवणे तसेच लोककला, ललितकथा, नाट्यशास्त्र याचे शिक्षण येथे देण्याचा मानस आहे. त्याबरोबर येथे कॅम्पस इंटरव्ह्यू आपल्या माध्यमातून सुरू होईल. यामुळे सीमाभागातील युवक स्वतःच्या पायावर उभा राहील. सीमागतील जनतेच्या अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडे आहेत त्यामुळे इथल्या शैक्षणिक  समस्या जाणून घेण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाशी संवाद साधावा यामध्ये अनेक नेते, महाराष्ट्र एकीकरण समिती, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था अशा अनेक संस्था आहेत यांच्याशी एक व्यापक बैठक घेण्याचे ठरले आहे. तसेच बेळगाव व खानापूर केंद्रबिंदू धरून हे उपकेंद्र चंदगडमध्ये व्हावे असा ठराव कमिटीने केले. तसेच शिनोळी बुद्रुक,शिनोळी खुर्द व  तुडये ग्रामस्थांनी हे शैक्षणिक संकुल उभा करण्यासाठी जमीन स्वइच्छेने देण्याचे ठरवले आहे. या सर्वांचे आमरार राजेश पाटील यानी आभार मानले आहे.
                           बातमीदार - एस. के. पाटील, तेऊरवाडी - प्रतिनिधी

No comments:

Post a Comment