वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २४ (बिनविषारी साप) काळतोंड्या (Black headed snake) - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २४ (बिनविषारी साप) काळतोंड्या (Black headed snake)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका  भाग : २४ (बिनविषारी साप) काळतोंड्या (Black headed snake)
काळतोंड्या साप ( Black headed snake/ Dumeril's black headed snake)
      काळतोंड्या हा  बिनविषारी साप भारतात दुर्मिळ असल्याने याचे दर्शन विशेषतः कोणाला होत नाही. तथापि ग्लोबल नेचर क्लब व हरित सेनेचे संघटक अशोक गायधने व सर्पमित्रांना साकोली येथे हा दुर्मिळ ‘ब्लॅक हेडेड स्नेक’ ऊर्फ काळतोंडय़ा साप  ९ आगस्ट २००९ रोजी प्रथमच जिवंत स्थितित आढळला. यामुळे सर्पमित्र व पर्यावरण प्रेमींचा उत्साह वाढला आहे. (यापूर्वी हा साप भंडारा जिल्हा व अन्य ठिकाणी  मृतावस्थेत आढळला आहे.)  
     धामण, तस्कर, नानेटी, पाणदिवड, अजगर, कुकरी, कवडय़ा,  नाग, घोणस, पट्टेरी मण्यार आदी साप  सर्पमित्र व नागरिकांना सर्रास दिसतात.   तथापि दुर्मिळ फॉस्टेन मांजऱ्या, ऑलिव्हस किल बॅक (तास्या), व  ‘ब्लॅक हेडेड स्नेक’ (काळतोंडय़ा) सापाची भर जैवविविधतेमध्ये पडली आहे.
या सापाला ‘डय़ुमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘सितिनोफिस सबपंक्टॅटस’ असूनयाचे तोंड काळे असल्यामुळे मराठी त्याचे नाव काळतोंड्या अशी पडले आहे.  याची सरासरी लांबी २५  ते जास्तीत जास्त ४६ सेमी ( वाळा सापा पेक्षा थोडा मोठा) असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर असते. हा बिनविषारी जातीचा साप आहे.  हुबेहूब असाच दिसणारा काळे डोके  मात्र शेपटीवरही काळा पट्टा असलेला ‘पोवळा’ नावाचा साप आहे ( याची माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत). हा पोवळा साप मात्र विषारी असतो. या दोन सापांच्या रंग व आकारातील साम्यामुळे बिनविषारी काळतोंडय़ा सापाला विषारी 'पोवळा' समजून मारले जाते. काळतोंडय़ा सापाचे खाद्य लहान पाली, किडे किंवा इतर छोटे साप हे आहे. हा साप पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment