सापांची मालिका भाग २७: पट्टेरी रेती सर्प - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2020

सापांची मालिका भाग २७: पट्टेरी रेती सर्प

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका 
 भाग : २७ : (निम विषारी/सौम्य विषारी साप) पट्टेरी रेती सर्प 

पट्टेरी रेती सर्प / वाळू साप /Leith's sand snake

 इंग्लिश नाव Condanarus sand snake, हिंदी नाव पट्टेरी रेतीला साप, शास्त्रीय नाव Psammophis Condanarus .
कोल्युब्रिडी / लेंप्रोफिड सर्प कुळातील हा साप असून पूर्ण वाढ झालेल्या  पट्टेरी रेती सर्पाची लांबी ६० ते १०७ सेंटीमीटर इतकी असते. (सरासरी लांबी ७० सेंटीमीटर) सडपातळ लांब व गोल शरीर, शेपटी लांब व बारीक अत्यंत निमुळती असते. तपकिरी डोक्यावर काळपट तपकिरी रेषा,  डोळे मोठे असतात. फिक्कट तपकिरी, बदामी, हिरवट शरीरावर समांतर पाच गडद (डार्क) तपकिरी पट्टे किंवा रेषा असतात. त्यामुळे याला पट्टेरी साप हे नाव पडले असावे. हा साप दाट व खुरटी जंगले, खडकाळ प्रदेशात ( विशेष करून पश्चिम महाराष्ट्र ते पंजाब या पश्चिम भारतातील जंगल युक्त भागात) राहतो. याचे नाव रेती किंवा वाळू सर्प असले तरी तो कधीच रेती अथवा वाळूत आढळत नाही. मुख्यतः मातीत राहणारा असला तरी झाडावर सुद्धा तितक्यात सराईतपणे वावरतो.
 महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल  हिमालयाच्या भागातही सर्वत्र पण कमी आढळतो. दुर्मिळ प्रजातीत याचा समावेश आहे. अशाच प्रकारचे साप म्यानमार, चीन, नेपाळ, पाकिस्तान (पाकिस्तानात याला रिबन साप असे नाव आहे.) आदी देशात सुद्धा आढळतात. फेब्रुवारी २०१९ मध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातही सर्पमित्रांना पट्टेरी रेती सर्प आढळला आहे. 
अंड्यातून यांचे प्रजनन होते.हा दिनचर असल्याने दिवसा फिरतो. शिकार करताना अत्यंत चपळ हालचाली साठी प्रसिद्ध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सरपटताना डोके वर उचलून सरपटतो. याच्या अंगावरील गडद तपकिरी रंगाचे समांतर पट्टे हे सुद्धा याचे वैशिष्ट्य आहे. यावरून तो तात्काळ ओळखता येतो. हा साप हरणटोळ/सर्पटोळ सारखा निमविषारी /सौम्य विषारी आहे. सरडे, सापसुरळी, उंदीर, बेडूक, कधी कधी छोटे साप हे याचे खाद्य आहे. 
माणसाच्या दृष्टीने हा साप निरुपद्रवी असल्याने या दुर्मिळ वन्य जीवाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment