वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २८ : (बिन विषारी साप) खापर खवल्या - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २८ : (बिन विषारी साप) खापर खवल्या

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका  भाग : २८ : (बिन विषारी साप) खापर खवल्या
                     खापर खवल्या / फिपसन्स शील्ड टेल
    इंग्रजी नाव Phipson's Shield tail / Indian Shield tail. खापर खवल्या हा एक बिनविषारी साप आहे. छोट्या आकाराच्या मांडुळ सापा सारखा दिसणारा पण त्याच्या पेक्षा खूप बारिक (लिहायच्या पेन इतका जाड) असा फारच दुर्मिळ साप आहे. याच्या शरिराचा रंग वैशिष्ट्यपूर्ण असा चकाकणारा काळा, काळपट जांभळा असून त्यावर पिवळे बारिक मोठे ठिपके असतात. याची विशेषता म्हणजे याचे डोके खूपच टोकदार असते. तर शेपटीचे टोक जाळीदार आवरणाने बंद केल्यासारखे दिसते. शेपटीच्या टोकाला जवळ पिवळा आडवा पट्टा असतो. याची लांबी १५ ते २५ सेंटिमीटर, जास्तीत जास्त ३०  सेंटीमीटर (एक फूट) असते. 
  गांडूळ, सरपटणारे किडे, अळ्या इत्यादी जीव जंतू हेच याचे खाद्य आहे. हा विशेषतः जमिनीखाली राहतो भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येतो. हा निशाचर असल्याने शक्‍यतो रात्रीच्या वेळी संचार करतो. तथापि क्वचित प्रसंगी दिवसाही भक्ष (गांडूळ) खाताना आढळतो. हा अतिशय दुर्मिळ प्रजातीत मोडतो. महाराष्ट्रात पुणे, मुंबई लगतच्या डोंगर भागात तसेच कोकण, महाबळेश्वर ते आंबोली, पारगड पट्ट्यात ( सह्याद्री पश्चिम घाट) व कर्नाटकातील काही भागात आढळतो. अलीकडच्या काळात जेजुरी तसेच रत्नागिरीत खापर खवल्या आढळल्यामुळे सर्पतज्ञांचा उत्साह वाढला आहे. इतरही अनेक भागात खापर खवल्या साप असले तरी आपण लक्ष देत नाही. किंवा सर्पतज्ञ व सर्पमित्रांना बोलावून त्याच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेत नाही हे वास्तव आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार याच्या फिपसन्स, इथॉल, महाबळेश्वरी खापर खवल्या, मोठ्या खवल्यांचा खापर खवल्या अशा चार उपजातीही असल्याची माहिती आहे.
      हा विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. उन्हाळा व हिवाळ्यात जमिनीखाली निद्रिस्त होत असावा. जमिनीवर अतिशय संथ गतीने सरपटत चालतो (गांडूळ पेक्षा थोडा गतिमान) सर्व सापात संथ गती आणि भित्रा साप आहे. याची शेपटी दाबुन धरल्यास हल्ला करण्यासाठी दाबलेल्या भागाकडे न वळता पुढे पळण्याचा किंवा मातीत/जमिनीत डोके घुसवून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment