![]() |
बेपत्ता स्वप्निल पवार याची कालकुंद्री तून पाठवणी करताना गजानन पाटील व इतर. |
कालकुंद्री येथे स्टँड परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून वीस बावीस वर्षीय तरुण फिरत होता . वाढलेली दाढी, केस, मळकट कपडे अशा अवतारावरून वेडसर असावा अशी गावकर्यांची समजूत होती. त्यात कोरोना दहशतीमुळे काहीही खायला न मिळाल्याने त्याच्या अंगात त्राण नव्हता.
याचे नाव काय, गाव कोणते असावे याबद्दल ग्रामस्थांना कुतूहल होते. शेवटी गजानन गावडू पाटील व दयानंद कांबळे यांनी याचा शोध घेण्याचा चंग बांधला. त्याला विश्वासात घेऊन माहिती काढली तेव्हा त्याचे नाव स्वप्नील पवार व गाव पुणे जिल्ह्यातील शिवली - भडवली असल्याचे निष्पन्न झाले. याकामी त्यांना पुणे येथे शिक्षक म्हणून काम केलेले राजेंद्र हेंडोळे यांचे सहकार्य लाभले.
नाव गाव निश्चित झाल्यानंतर गजानन पाटील व त्यांच्या मित्रांनी त्यांच्या कुटुंबीयांची संपर्क साधून कालकुंद्री येथे बोलावून घेतले. आज त्याची पाठवणी केली. गजानन पाटील यांनी त्याच्या प्रवास खर्चासाठी म्हणून गावातून मदत गोळा करून ती त्याच्या भावाकडे सुपूर्द केली. दोघांनी कालकुंद्री गावाच्या संवेदनशील सहकार्याबद्दल भावपूर्ण उद्गारासह निरोप घेतला. बेपत्ता स्वप्निलचा गेले आठ महिने आपण शोध घेत असल्याचे यावेळी त्याच्या भावाने सांगितले.
दहा-बारा दिवसात त्याचे खाणे पिणे, सलून मध्ये नेऊन केस कापणे, अंथरूण पांघरूण, कपडे देणे याकामी भरत कांबळे, दयानंद कांबळे, गजानन गावडु पाटील यांचेसह राहुल शंकर जाधव, सुनील आनंद पाटील , किरण जोशी, शिराज मुल्ला, रमजान मुल्ला यांचेसह गावातील अनेक तरुणांनी काळजी घेतली.
राज्यात व देशात बेपत्ता झाल्याच्या घटना नेहमी घडत असतात. प्रत्येकाच्या बाबतीत नागरिक अशी संवेदनशीलता दाखवतील का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
No comments:
Post a Comment