कोविड ड्युटीवरील शिक्षकांना लेखी आदेश मिळणार; शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2020

कोविड ड्युटीवरील शिक्षकांना लेखी आदेश मिळणार; शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

 चंदगड तालुक्यातील कोरोना कोविड ड्युटीवरील शिक्षकांना लेखी आदेश नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शिक्षक संघासह विविध संघटनांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार यांचेकडे  शिक्षकांना कोविंड ड्युटीचे लिखित स्वरूपात आदेश द्या. अशी मागणी केली होती. त्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय शिक्षकांचे आदेश ऑनलाईन पाठवले आहेत. त्याची प्रिंट संबंधित शिक्षकांना काढून घ्यावी लागणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश हुद्दार, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, कार्याध्यक्ष शाहू पाटील, शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील आदींनी दिली आहे.
  गेल्या काही दिवसात कोल्हापूर सह विविध जिल्ह्यात कोविड ड्युटीवरील शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. तथापि या शिक्षकांना लेखी आदेश नसल्यामुळे विमा कंपन्या व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनीही हात वर केले यामुळे कर्मचाऱ्यांचे वारसदार विविध लाभापासून वंचित राहिले. याचे संतप्त पडसाद राज्यभर उमटले होते. काही जिल्ह्यात लेखी आदेशाशिवाय ड्युटीवर जाणार नसल्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड मधील अधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. आदेश वैयक्तिक व लेखी स्वरूपात मिळावेत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment