ॲम्बुलन्स सोबत डॉ. आझाद नायकवडी सोबत मंत्री हसन मुश्रीफ व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
करोना लढ्यात ॲम्बुलन्सचा तुटवडा म्हणून स्वत:च्या मारूती व्हॅनला ॲम्बुलन्स बनवून दान करणारा जन्माने आणि धर्माने फक्त भारतीय असणारा शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी पापालाल नायकवडी म्हणजे (माध्यमिक शिक्षक) कोल्हापूरला पडलेलं एक सुखद स्वप्नचं आहे. परवा मुस्लिम बांधवाचं निधन झालं. ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे पार्थिव दफनभूमीत यायला चार तास उशीर झाला. जमलेल्या लोकांनी ॲम्बुलन्स भरपूर असतील तर पार्थिवाची हेळसांड होणार नाही असे मत मांडले. करोनाच्या महामारीत ॲम्बुलन्सची तर फारच निकड भासत होती.
चर्चा झाली, पण आझादचे संवेदनशील मन मात्र त्याला अस्वस्थ करू लागले. आझादने मागचा पुढचा कोणताही विचार न करता उपस्थित बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांना मी माझी मारूती व्हॅन तुम्हाला ॲम्बुलन्स बनवून देतो असे सांगितले. आझाद,स्वत:ची गाडी माणसे एखाद्या पेशंटला वा एखाद्या वृद्धाला दवाखान्यात पोहचवायलाही देत नाहीत. तू तर गाडीच दान करून टाकतोस? कुठल्या रक्तामासाचा तू बनला आहेस? आझादने घरी येऊन आपली मारूती व्हॅन लगेच बैतुलमाल कमिटीकडे सोपविली. कमिटीच्या सदस्यांनी मारूतीचे इंजिन, ऑईल, रेडियम व अन्य कामे करून गाडी अद्ययावत बनविली. गाडीचे अद्ययावत ॲम्बुलन्समध्ये रूपांतर झाल्यावर गाडी १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिनी सर्कीट हाऊस कोल्हापूर येथे हसन मुश्रीफ , ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते बैतुलमाल कमिटीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे
आझाद म्हणतो," मारूती व्हॅन म्हणजे माझी दुसरी आई होती. महाराष्ट्रभर अनेक शाहीरीचे कार्यक्रम या गाडीतून केले. गाडीवर ड्रायव्हर ठेवायची ऐपत नसल्याने गाडी चालवत जायचे तीन तीन तास पोवाड्याचे कार्यक्रम करायचे व परत यायचे हे सर्व या गाडीने केले आहे. कित्येक वेळा पदरमोड करून कार्यक्रम केले. गाडीचे पेट्रोलही मिळायचे नाही. लोक फक्त वापरून घेत होते,पण आवडीसाठी सर्व करत गेलो. महामहिम राष्ट्रपती महोदय यांचेसमोर मुंबईत कार्यक्रम असताना अनेक व्ही आय पी लालदिव्यांच्या गाड्यासोबत ही मारूती पार्क केल्याचा अभिमान वाटतो. संघर्षाच्या काळात गाडीने साथ दिली असल्याने गाडी आईसारखी होती. एका उदात्त कामासाठी गाडीचे रूपांतर ॲम्बुलन्स मध्ये करून देताना म्हणूनच परमानंद होत आहे. आज बँक खात्यात फक्त २५०० रूपये असले तरी गाडी देताना लाखमोलाचा आनंद होत असल्याचे सांगितले. बैतुलमाल कमिटी म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हजारो गरीब,वंचित व गरजू लोकांना भोजन व अन्नधान्याचे कीट पुरविणारी व कोल्हापूर जिल्ह्यातील जे मृतदेह करोनाने मृत्यू झाल्यामुळे मुले व पत्नी सुद्धा हात लावत नसताना त्या मृतदेहावर मानवतेच्या दृष्टीकोनातून मृतदेहाच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करणारी सेवाभावी लोकांची संस्था. या लोकांसाठी गाडी देण्याचा आनंद म्हणूनच फार वेगळा आहे.
माऊली केअर सेंटर वृद्धासाठी असणारा आश्रम आहे. करोना महामारीच्या काळात प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रत्येक वृद्धास किमान अर्धा लिटर दूधाची गरज आहे हे लक्षात येताच आझादने पुढाकार घेऊन माणुसकी मंच" च्या दूध देण्यासाठी समाजातील चाळीस सेवाभावी लोकांना अवाहन करून जिवंत असेपर्यंत रोज अर्धा लिटर प्रमाणे वीस लिटर दूध देण्याचा शुभारंभही १५ ऑगष्ट पासून होत आहे. अंत:करणात करूणेचा सागर असतो तेव्हाच असली समाजकार्ये होत असतात आझादने रस्त्यावर बेवारस असणारी मुले, माणसे यांना मायेचा आधार देण्याचे काम पुढाकार घेऊन केले आहे. अनेक गरीब, वंचित व गरजूंना वह्या, पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, शाळेची फी, सहलीचे पैसे, होस्टेलची फी भरून मदत केली आहे सेवाभाव व माणुसकी ही आझादची जीवनशैली बनली आहे. सोशीक, परोपकारी, व समजूतदार पत्नी, मानवतेचे पूजारी असणारे आई - वडील यांच्यामुळे आझाद मुक्तपणे सेवा करत आहे आझाद हा प्रिन्सेस उषाराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षक आहे. आझादचे घर म्हणजे सहजीवन, सहभोजन, सहशिक्षण व सहजाणीव या सर्वांचे शिक्षण देणारे एक अनैपचारिक विद्यापीठच आहे. आझादची संतुष्ट व गुणी पत्नी तासिका तत्वावर प्राध्यापिका आहे. आई व वडील सेवानिवृत्त शिक्षक असल्याने संस्काराचा वारसा घरातूनच मिळाला आहे. शाहीरीचा वारसाही वडीलांचाच आहे आझाद तुझ्या कार्यास मनापासून भरभरून हार्दीक शुभेच्छा आझाद म्हणतो, "मानव तितुका एकच आहे, उच्च न कोणी नीच न कोणी हाच आमुचा धर्म खरोखर, हीच आमुची शाश्वत वाणी.
No comments:
Post a Comment