कोवाड ग्रामपंचायतीचा कौल कूणाच्या बाजूने? सत्ताधारी गड राखणार का विरोधक बाजी मारणार! - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2021

कोवाड ग्रामपंचायतीचा कौल कूणाच्या बाजूने? सत्ताधारी गड राखणार का विरोधक बाजी मारणार!

 

कोवाड (ता.चंदगड) येथील ग्रामपंचायत.

    संजय पाटील - कोवाड / सी. एल. वृत्तसेवा 

          किणी कर्यात भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने होत आहे .कर्यात भागातील मोठ्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार यांचा कोवाड करांसह तालूक्यातील जनतेलाही अंदाज येत नाही आहे. त्यामळे सत्ताधारी सत्ता राखणार की विरोधक बाजी मारणार हीच चर्चा जोरात सुरू आहे.

        कोवाड गावातील सर्वच गट तंटामूक्तच्या पूढाकाराने एकाच छताखाली येऊन निवडणुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सूरू होत्या, बिनविरोध च्या दिशेने वाटचाल असलेली ग्रामपंचायत अर्ज माघारीच्या दिवशी नाट्यमय घडलेल्या घटनांनी पुन्हा चर्चेत येऊन बिनविरोध चा प्रयत्न फसला. गावातील सर्वच गट एका छताखाली येत असलेचे चित्र असताना अर्ज माघारीच्या दिवशी अंतिम क्षणी एका गटाच्या पावित्र्याने ठिकाणी निवडणूक अनिवार्य झाली.आज अखेर अर्ज माघारी नंतर एकूण 37 उमेदवार हे रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस या निवडणुकीत निर्माण झाली आहे. पाच वर्षे सत्तेत असणारे उमेदवार या निवडणुकीत आमनेसामने असताना बघायला मिळत आहेत.फोडाफोडीचे राजकारण,डाव प्रतिडावाला तर जोर चढला असून एकूण चारही प्रभागात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे.प्रभाग क्र 1 मध्ये उपलब्ध यादी नुसार 825 , प्रभाग क्र 2 मध्ये 802 ,प्रभाग क्र 3 मध्ये 556 , तर प्रभाग क्र 4 मधील 710 असे गावातील एकूण 2893 इतके मतदार हे मतदानाचा हक्क बजावत असून यामध्ये पुरुष मतदार 1481 व स्त्री 1412 मतदार आहेत. आज चारही प्रभागामध्ये शिवसेना पॅनेल,श्री राम ग्रामविकास आघाडी व माऊली ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आमनेसामने असून तीन प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी कडून श्री सिद्धिविनायक आघाडीने चार उमेदवार उभे करून लढतीमध्ये आव्हान उभे केले आहे.त्याशिवाय काही प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार असून त्या त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी देखील निकालावर परिणाम करू शकते.याठिकाणी आजअखेर विद्यमान जि प सदस्य,माजी महिला सरपंच,माजी उपसरपंच,भाजपा शहर प्रमुखांसह अनेक माजी ग्रामपंचायत सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संपूर्ण चंदगड तालुक्याचे लक्ष हे याठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे लागले असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार,कोण बाजी मारणार,बहुमत एका विशिष्ट आघाडीकडे देणार,कि मागील वेळे सारखा कौल संमिश्र देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.प्रभाग क्रमांक 1 मध्ये 825 मतदार असून श्री राम ग्रामविकास आघाडी,भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेल, माऊली पॅनल आणि शिवसेना पॅनेलचे उमेदवार असून याठिकाणी विद्यमान महिला सरपंचासह ,भाजपा उमेदवार आणि शिवसेना उमेदवार यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.प्रभाग क्रमांक 2 मध्ये 802 मतदार असून चारही आघाड्याचे उमेदवार नशीब आजमावत आहेत. याठिकाणी तिरंगी लढा पहायला मिळत आहे.प्रभाग क्रमांक 3 मध्ये 556 इतकी कमी मतदार संख्या असून देखील वरील तिन्ही आघाड्यांच्या उमेदवारांसोबत 2 अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होत असून असून याठिकाणी विद्यमान उपसरपंचा सह विद्यमान दोन्ही माजी ग्रामपंचायत महिला सदस्या मध्ये सरळ लढत रंगणार आहे.प्रभाग क्रमांक 4 मध्ये 710 इतकी मतदार संख्या असून चारही आघाड्यासह एक अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होत आहे. गेले चार दिवसांपासून प्रत्येक आघाडी बरोबरच अपक्ष देखील मतदारांपर्यत पोचण्यात यशस्वी झाले असून सर्वानी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर विशेष भर दिला आहे. मागील दोन दिवसात आश्वासनांच्या खैराती,जेवणावळीनी जोर धरला आहे. .अशा परिस्थितीत मतदार आपले बहुमोल मत कोणाच्या पारड्यात टाकणार,कोणाला झुकते माप देणार याचीच चर्चा सगळीकडे जोरात चालू आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड या ठिकानावरील तीन इमारतीमधील पूर्वेकडील दोन तर पश्चिमकडील दोन अशा एकूण चार केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. ठोंबरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment