संदीपच्या अचानक जाण्याने सारे देवरवाडीकर गहिवरले - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2021

संदीपच्या अचानक जाण्याने सारे देवरवाडीकर गहिवरले

संदीप शंकर पुजारी

कागणी : एस. एल. तारीहाळकर, सी. एल. वृत्तसेवा

         देवरवाडी (ता. चंदगड) येथील संदीप शंकर (इराप्पा) पुजारी (वय 25) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. अचानकपणे त्याचे जाणे सर्वांना धक्कादायक ठरले. सारे देवरवाडीकर व त्याचे मित्रमंडळ गहिवरून गेले आहेत. 'जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला ' याची प्रचिती या घटनेमुळे त्याच्या मित्रमंडळाला आली. 
         कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना चालता-बोलता संदीप अचानकपणे देवाघरी निघून गेला. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आज त्यांच्या संसाराचा खेळ अर्ध्यावरच राहिला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, आजी, पत्नी असा परिवार आहे. काजू प्रक्रिया उद्योजक शिवकुमार पुजारी यांचा तो भाऊ तर वैजनाथ मंदिर आवारातील दुकानदार शंकर (इराप्पा) पुजारी यांचा तो मुलगा होता. संदीप हा शिनोळी येथील डॉल्फिन कंपनीचे पुजारी म्हणून काम करत होता. सर्वात मिळून मिसळुन रहात असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात तो हिरारीने सहभाग असे. नुकत्याच झालेल्या देवरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारलेल्या युवा परिवर्तन ग्राम विकास आघाडीमध्ये तो एक सक्रीय कार्यकर्ता होता. तो नेहमीप्रमाणे पहाटे डॉल्फिन कंपनीमध्ये पूजा करून घरी परतला. यानंतर काही वेळातच त्याला हृदय विकाराचा धक्का बसला. तो आपल्या मित्रांबरोबर रात्री एक वाजेपर्यंत एका कार्यक्रमात आनंदात होता. मात्र दुसर्‍या दिवशी नीयतीने मात्र सारे फासे उलटले. ग्रामपंचायत निवडणुकीत युवा परिवर्तन आघाडीची सत्ता जरी आली असली तरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच निवडीचा आनंद मात्र आम्हाला व्यक्त करता येणार नाही, ही खंत मात्र त्याच्या मित्रांना लागून आहे.


No comments:

Post a Comment