कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना केद्राची पाच लाखांची मदत जाहीर, महाराष्ट्र सरकारने देखील अनुकरण करावे - एस. एम. देशमुख यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2021

कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना केद्राची पाच लाखांची मदत जाहीर, महाराष्ट्र सरकारने देखील अनुकरण करावे - एस. एम. देशमुख यांची मागणी

एस. एम. देशमुख

मुंबई / प्रतिनिधी

        महाराष्ट्रात कोरोनानं 54 पत्रकारांचे प्राण घेतले..त्यांच्या कुटुंबियांनी राज्य सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सातत्यानं मराठी पत्रकार परिषदेने केली असली तरी सरकार त्याबाबत कोणताच निर्णय घ्यायला तयार नाही.मात्र आता केंद्र सरकारने कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.मराठी पत्रकार परिषद केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे भूमिका एस.एम.देशमुख यांनी मांडली आहे.

     माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण समितीची एक बैठक सोमवारी पार पडली.या बैठकीत ज्या पत्रकारांचे निधन कोरोनानं झालंय अशा 39 पत्रकारांची माहिती केंद्र सरकारकडं उपलब्ध झाली त्या सर्व पत्रकाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.पत्रकारांना मदत करता यावी यासाठी पत्रकार कल्याण निधीच्या कोषात जवळपास दीड कोटी रूपये अतिरिक्त राशीची तरतूद करण्याचा निर्णय देखील नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.देशातील सर्व राज्यांच्या पत्रकार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

      मराठी पत्रकार परिषदेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनानं 54 पत्रकारांचे निधन झाले आहे..त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पाठपुरावा केल्यानंतरही सरकारने त्यासंबंधीची भूमिका घेतलेली नाही.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात कोरोनानं मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.मात्र ती घोषणाही हवेतच विरली.राज्य सरकारने आतातरी निर्णय घेऊन जे पत्रकार कोरोनानं गेले त्यांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. 



No comments:

Post a Comment