![]() |
सुरुवातीला तरारलेल्या मसूर मोहरी पिकावर नंतरच्या अनियमित हवामानामुळे गंडांतर आले आहे. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
अनियमित हवामानामुळे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील आगळ्या चवीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मसूर कडधान्य पिकांवर गंडांतर आले आहे. याचा परिणाम मसुरीची उत्पादन घटनेवर होणार आहे. कमी उपलब्धतेमुळे अख्खा मसूर खवय्यांसाठी मात्र ही वाईट बातमी आहे.
भागात झालेल्या अनेक लघु पाटबंधारे धरणामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. परिणामी इकडे ऊस पिकाचे क्षेत्र कमालीचे वाढले तर भात व ते कापल्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर पेरले जाणारे मसूर, वाटाणा, हरभरा, मोहरी, गहू या रब्बी पिकांचे क्षेत्र घटले आहे. मसूर वाटाणा मळणी नंतर मिळणाऱ्या चवदार व पौष्टिक कोंड्याला (व्हाट) पशुधनही मुकले आहे. त्यातच यंदा रोज बदलणाऱ्या हवामानामुळे या पिकांवर गंडांतर आले आहे. कर्यात भागातील कालकुंद्री, कुदनुर, कोवाड, निटूर, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, किणी, कागणी, नागरदळे आदी पंधरा-वीस गावात या चवदार मसूरीचे उत्पादन होते. तुटवड्याची शक्यता गृहीत धरून खवय्यांनी कडपाल सुगी पूर्वीच पाहुण्यांच्या माध्यमातून आत्तापासूनच मसूर खरेदीसाठी फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment