सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार सपशेल अपयशी - राजे समरजितसिंह घाटगे, चंदगड येथे भाजपची आढावा बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2021

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार सपशेल अपयशी - राजे समरजितसिंह घाटगे, चंदगड येथे भाजपची आढावा बैठक

चंदगड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, शेजारी भरमुआण्णा पाटील, शांताराम पाटील, समृद्धी काणेकर, नामदेव पाटील व इतर. 


चंदगड / प्रतिनिधी 

           सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अतोनात हाल होत असलेली सर्वसामान्य  जनता व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवावा. असे आवाहन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी केले.

चंदगड येथे भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान करताना जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे, शेजारी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील व इतर.

        चंदगड येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. 

      ते पुढे म्हणाले, ``राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याबाबत घोषणा  केली. परंतु त्यांमध्ये यु-टर्न घेऊन ती भरण्याबाबत तगादा लावला आहे. शिवाय वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत सुद्धा कोणत्याही प्रकारच्या हालचाली शासन पातळीवर दिसत नाहीत. याशिवाय राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासूनही शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता राज्य सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त झाली आहे. त्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही दिली.``

         यावेळी माजी ऊर्जा राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माधुरी सावंत, विठ्ठल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शांताराम पाटील, अंकुश गवस, बबन देसाई, यशवंत सोनार, उदयकुमार देशपांडे, समृद्धी काणेकर, रवींद्र बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले. आर. जी. पाटील यांनी आभार मानले. 


                            संस्कार जनसेवेचे........

        सत्ता असो वा नसो सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत राहण्याचे संस्कार स्व. राजेविक्रमसिंह घाटगे यांनी माझ्यावर केले आहेत. हे करीत असताना कितीही टीकाटिप्पणी झाली. तरी माझ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठीच्या सेवेच्या व्रतात मी खंड पडू देणार नाही. त्याप्रमाणेच भाजप पदाधिकारी यांनी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत रहावे व माणसं जोडावीत असे आवाहन श्री. घाटगे  यांनी केले.

No comments:

Post a Comment