वैरणीचे दर गगनाला भिडले, शेतकरी गुंतले साठे सुरक्षेच्या कामात, पहा काय आहे कारण........ - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

वैरणीचे दर गगनाला भिडले, शेतकरी गुंतले साठे सुरक्षेच्या कामात, पहा काय आहे कारण........

गवत गंजी (व्हळी) रचून जनावरांची वर्षभराची बेगमी करताना कालकुंद्री येथील शेतकरी. 

विशाल पाटील / कालकुंद्री - सी एल वृत्तसेवा

   "उंदीर पेटती वात पळवतील. यामुळे गवताच्या साठ्यांना आगी लागून पशुधनाची उपासमार होईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी वैरणीचे साठे जीवापाड जपा." अशा आशयाची पत्रे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड- किल्ल्यावरील किल्लेदारांना पाठवल्याचे पुरावे आजही सापडतात. या दूरदृष्टीच्या राजांनी साडेतीनशे वर्षापूर्वीही वैरण व वृक्षांचे महत्व जाणले होते.

   सद्यस्थितीत वैरणीचे गगनाला भिडलेले दर पाहता शेतकरी व पशुपालक पशुधनाची वर्षभराची बेगमी सुरक्षित करण्यात मग्न असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही वर्षा पूर्वी एखाद्या टाकाऊ वस्तूला पिंजराची उपमा दिली जायची. मात्र त्याच एका ट्रॉली भर पिंजराची किंमत चार ते सहा हजार रुपयांच्या घरात गेली आहे. तर शाळूच्या एका कडबा पेंडी ची किंमत दोन-तीन रुपयावरून पंधरा ते वीस रुपयांवर गेली असून पेंडीचा आकार मात्र पहिल्यापेक्षा निम्म्या झाल्याचे शेतकरी सांगतात. सध्या शेतकऱ्यांसाठी नगदी व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच मिळणारे शेणखत पिकांसाठी महत्त्वाचे असल्याने वैरणीला  सोन्याचा भाव आला आहे. यात पिंजर, कराड, शाळू, मका आदींचा कडबा याची काडी काडी जमा करून शेतकरी पावसाळ्यापूर्वी गवत गंजीत सुरक्षित करत आहेत. बऱ्याच ठिकाणी गवत गंजीत पाणी उतरू नये म्हणून प्लॅस्टिक ताडपत्रीचा वापर वाढला आहे. तर दुसरीकडे गवत साठ्यांना आगी लावण्याचे खेदजनक प्रकारही घडताना दिसत आहेत. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.




No comments:

Post a Comment