लसीकरणात कोवाड प्रा. आ. केंद्र अग्रेसर; उद्दिष्टाच्या १०५ टक्के लसीकरण, एकाच दिवशी चार रुग्ण पॉझिटिव्ह, यंत्रणेची तारांबळ - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2021

लसीकरणात कोवाड प्रा. आ. केंद्र अग्रेसर; उद्दिष्टाच्या १०५ टक्के लसीकरण, एकाच दिवशी चार रुग्ण पॉझिटिव्ह, यंत्रणेची तारांबळ

लसीकरणानंतर विश्रांती कक्षात थांबलेले नागरिक

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उद्दिष्टाच्या १०५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्नकुमार चौगुले यांनी दिली. 

     शासनाकडून आरोग्य केंद्रास ११ हजार लसीकरण उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि ४ मार्च ते २३ एप्रिल २०२१ अखेर ११ हजार ६०० नागरिकांनी लस घेतली. तर दि. २७ अखेर ही संख्या १२,८०० पर्यंत वाढली आहे. यात कोविशील्ड व कोव्हॅक्सिन चे लसीकरण करण्यात आले आहे. कोवाड आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांव्यतिरिक्त अन्य केंद्रांत अंतर्भूत नागरिकांनीही येथे लस घेतल्यामुळे संख्या अधिक वाढली आहे. मात्र कोवाड केंद्रात येणाऱ्या चन्नेहट्टी, यर्तेनहट्टी, जक्कनहट्टी, राजेवाडी, गणेशवाडी आदी कानडी भाषिक गावांचा लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. येथील टक्का वाढवण्यासाठी शासन व प्रशासनाच्या अन्य विभागानी त्यांच्या प्रबोधनासाठी सहकार्य करावे. असे आवाहनही डॉ. चौगुले यांनी केले. गेले सुमारे दोन महिने आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी व त्यांच्या जोडीला असलेल्या शिक्षक- शिक्षिकांनी चांगले कार्य केल्यामुळेच आपण अग्रेसर ठरू शकलो अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. चार दिवसापूर्वी उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदी अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन आरोग्य केंद्रातील कामाबाबत समाधान व्यक्त केले होते.

               चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तारांबळ

       आज मंगळवार दि. २७ रोजी कोवाड प्रा. आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन कोविशील्ड चा दुसरा डोस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दुपारी कोरोनाची लक्षणे दिसणारे किणी, ता. चंदगड येथील दोन रुग्ण आरोग्य केंद्रात आले होते. त्यांच्या अँटीजेन चाचणीनंतर ते पॉझिटिव्ह निघाले. यामुळे आरोग्य यंत्रणेची काही काळ तारांबळ उडाली. सर्वांना बाहेर काढून पॉझिटिव रुग्णाचा वावर झालेला भाग तात्काळ फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. काही वेळातच या दोन रुग्णांच्या संपर्कातील आणखी दोघांच्या चाचणी नंतर तेही पॉझिटिव निघाल्याने किणी येथील कोरोनाग्रस्त संख्या एकाच दिवसात चारवर गेल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर लसीकरणसाठी आलेले नागरिकांनी अधिकच खबरदारी घेत असल्याचे दिसत होते.

No comments:

Post a Comment