चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पत्रकांराच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या कारणास्तव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस. एम. देशमुख १ मे रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी चंदगड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी दिली.
राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी अर्ज - विनंत्या, आंदोलने, हजारो इमेल पाठवून प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तथापि पत्रकारांप्रती सरकार उदासिन असून मागण्यांकडे वारंवार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात पत्रकारांना वेळेत, योग्य उपचार मिळत नसल्याने पत्रकारांचे मृत्यू होत आहेत. आत्तापर्यंत राज्यात ११३ पत्रकारांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढतच आहे. त्यामुळे माध्यम जगताला काळजी व भितीने ग्रासले आहे. सरकार मात्र बेफिकीर आहे.
सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी, कोरोना बळी ठरलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी, पत्रकारांसाठी रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवावा त्यांना योग्य उपचार मिळावेत. आदी मागण्या मराठी पत्रकार परिषदेने केल्या असल्या तरी शासनाकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
हे सारं हेतूतः होतंय का? अशी शंका येते. तर दुसरीकडे माध्यम समुहांनी पत्रकारांना कामावरून कमी करणे किंवा बेकायदा वेतन/मानधन कपातीचा सपाटा लावलेला आहे. सरकारच्या पत्रकारांप्रती निष्काळजीपणाच्या निषेधार्थ १ मे, महाराष्ट्र दिनी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख आत्मक्लेष आंदोलन करीत आहे.
मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यातील तमाम पत्रकारांनी या आंदोलनास पाठिंबा दिलेला असुन चंदगड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. चंदगड तहसील कार्यालयासमोर नियोजित असलेले उपोषण व धरणे आंदोलन कोरोना पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे सर्वजण घरी थांबूनच करणार असल्याची माहिती अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी दिली. यावेळी झालेल्या ऑनलाईन मिटींगला उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव चेतन शेरेगार, खजिनदार संपत पाटील, संस्थापक अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, संजय के पाटील, संजय म. पाटील, तातोबा गावडा, सुनील कोंडुसकर, शानुर मुल्ला, दीपक कालकुंद्रीकर, विनायक पाटील, प्रकाश ऐनापुरे, महेश बसापुरे, विलास कागणकर, ए. टी. पाटील, निवृत्ती हारकारे, विजयकुमार दळवी, नारायण गडकरी, फिरोज मुल्ला, लक्ष्मण व्हन्याळकर, संदीप तारीहाळकर, राजेंद्र शिवणगेकर, संतोष सुतार, बाबासाहेब मुल्ला, संजय कुट्रे, नंदकिशोर गावडे, प्रदीप पाटील, लक्ष्मण आडाव, ज्ञानेश्वर पाटील, राहूल पाटील आदींची उपस्थित होते.
No comments:
Post a Comment