चंदगड नगरपंचायतीला पाच कोटीचा विकासनिधी मंजूर, आमदार पाटील यांचे सहकार्य - सौ. प्राची काणेकर, पत्रकार परिषदेत माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2021

चंदगड नगरपंचायतीला पाच कोटीचा विकासनिधी मंजूर, आमदार पाटील यांचे सहकार्य - सौ. प्राची काणेकर, पत्रकार परिषदेत माहीती

सौ. प्राची काणेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कामी उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,आमदार राजेश पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

         सौ. काणेकर पुढे म्हणाल्या, ``शहरातील एकूण ३७ कामांसाठी हा पाच कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल. सद्यस्थितीत शहरांमध्ये शिवशक्ती स्थळाचे काम सुरू आहे. त्याचे सुशोभीकरण व रोषणाईसाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथे पाच हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. संभाजी चौकात महिलांसाठी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मदरसा अरेबिया कासिमूल उलूम येथे सभागृह व शौचालय बांधकामासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लिंगायत समाज स्मशानभूमीच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी २० लाख रुपये, तर देव म्हारतळ संरक्षक भिंतीसाठी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. रामदेव गल्ली व प्रभाग क्रमांक आठमधील दत्तू कांबळे ते प्रशांत अनगुडे यांच्या घरापर्यंतची गटर अंडरग्राउंड करण्यात येणार आहे. 

        याशिवाय प्रत्येक प्रभागातील रस्ते व गटर बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी दर्जेदार कामे करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हा विकास निधी मंजूर करण्याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, इतर नगरसेवकांचे सहकार्य लाभले. यावेळी पं. स. सदस्य दयानंद काणेकर, संगयोचे अध्यक्ष प्रवीण वांटगी, संजय चंदगडकर, महेश वणकूंद्रे, विनायक काणेकर आदी उपस्थित होते.  


        जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिनी पं स सदस्य दयानंद काणेकर यांनी आमदार राजेश पाटील  यांच्याकडे ५ कोटी ठोक निधीसाठी निवेदनाद्वारे  मागणी केली होती,याचा संपूर्ण पाठपुरावा आम. राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे करून हा निधी चंदगड नगरपंचायतीला मिळवून दिला असल्याचेही नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment