८५ वर्षांच्या आजीने कोरोनाला केले चितपट! संभाजी ब्रिगेडच्या कोव्हीड सेंटरचा बोलबाला - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2021

८५ वर्षांच्या आजीने कोरोनाला केले चितपट! संभाजी ब्रिगेडच्या कोव्हीड सेंटरचा बोलबाला

 

कोरोनाला हरवून कृतज्ञतेने निरोप घेताना इंदुबाई पाटील यावेळी उपस्थित रुपेश पाटील, सहकारी व आरोग्य कर्मचारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण, नेते, खेळाडू, शरीरसौष्ठवपटू, पैलवान (घाबरून?) बळी पडत असताना एका ८५ वर्षांच्या आजीने या धोकादायक कोरोनाला चितपट केलंय. हे आश्चर्य घडलंय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोल्हापूर नजीकच्या गिरगाव- पाचगाव सेंटरमध्ये.

     कोल्हापूर शहरातील सर्व रुग्णालये कोरोना रुग्णांनी ओसंडून वाहत असताना रुपेश पाटील यांनी ब्रिगेडचे सदस्य व परिसरातील तरुणांच्या सहकार्याने गिरगाव- पाचगाव येथील राजर्षी शाहू निवासी शाळेत १०० बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करून परिसरातील रुग्णांना फार मोठा आधार दिला आहे. याचे उद्घाटन खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी झाले होते. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून येथील स्वयंसेवकांना सर्व सुरक्षा साधने, रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषधोपचार, पौष्टिक व संतुलित आहार पुरवला जात आहे.

      या सेंटर मधून रोज अनेक रुग्ण कोरोना वर मात करून बाहेर पडत आहेत. ही संभाजी ब्रिगेड साठी समाधान व अभिमानास्पद गोष्ट आहे. यावर कळस चढविला तो इंदुबाई गणपती पाटील या गिरगाव, ता. करवीर येथील ८५ वर्षांच्या आजीने! गंभीर अवस्थेत सेंटरमध्ये दाखल झालेल्या आजीने आपल्या जगण्याच्या जिद्दीमुळे कोरोनावर मात केली आणि सेंटर वरील सर्व डॉक्टर, स्वयंसेवक व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञतेने हसतमुख निरोप घेतला. संभाजी ब्रिगेड ने सुद्धा यावेळी रण हलगीच्या कडकडाट करून उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांमध्ये उत्साह निर्माण केला.

 तत्पर आणि निरपेक्ष सेवेमुळे लोकप्रिय ठरलेल्या या कोरोना सेंटरची धुरा वाहणाऱ्या रुपेश पाटील यांना पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच जालंधर पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव, ग्रामसेवक पुनम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, उत्तम विष्णू पाटील, उत्तम बापू पाटील, जालिंदर पाटील, सुभाष पाटील, निलेश सुतार, ज्ञानेश्वर साळोखे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, गिरगाव मधील माजी सैनिक व युवकांचे सहकार्य लाभत आहे.



No comments:

Post a Comment