कोनेवाडी येथे शॉर्टसर्कीटने घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी जळून खाक, लाखोंचे नुकसान, मदतीची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2021

कोनेवाडी येथे शॉर्टसर्कीटने घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी जळून खाक, लाखोंचे नुकसान, मदतीची गरज

कोनेवाडी (ता. चंदगड) येथे शॉर्टसर्कीटने घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी जळून खाक झाले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

कोनेवाडी (ता. चंदगड) येथे गुरुवारी रात्री सट्टु मुकुंद गावडे यांच्या रहात्या  घराला शॉर्टसर्कीटने अचानक लागलेल्या आगीत रहात्या घरासह संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यामध्ये सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जळीताचा पंचनामा करताना तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व पोलिस पाटील.

यासंदर्भात माहीती अशी – सट्टु गावडे यांचे 2019 रोजी चंदगड तालुक्यात आलेल्या महापुरात घर पडून जमीनदोस्त झाले होते. तेव्हापासून ते घर बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना घर बांधणे शक्य झाले नाही. किती दिवस दुसऱ्यांच्या घरात रहायचे म्हणून त्यांनी आपल्या जागेत पत्राचे खोपटे उभे करुन ते त्यामध्ये रहात होते. त्यांना अर्धांगवायु झाला असला तरी त्यातूनही ते कसेबसे आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होते. 

आगीत जळालेल्या काजू.

गुरुवारी रात्री ते आपल्या पत्नीसोबत गावातील मुलाच्या घरी मुक्कामाला गेले होते. त्याच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. आग लागल्याची माहीती गावामध्ये समजताच ग्रामस्थांनी घरातील घाघरीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केल. त्याचबरोबर विद्युत मोटारीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते. 2019 साली आलेल्या महापुरात घर पडले होते. त्यानंतर आता कसेबसे उभे केलेले घरही जळून गेल्याने गावडेही कुटुंबिय बेघर झाले असून रस्त्यावर आले आहे. समाजातील दानशुर व्यक्तींना त्यांना सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. 

आगीमध्ये जळालेले संसारोपयोगी साहित्य.

या आगीमध्ये काजुची ७ पोती, नाचना ६ पोती, भुईमुग ४ पोती, भात २१ पोती, सिमेंट पत्रे व लाकुड साहित्य ५४ नग, सोने व रोख रक्कम, शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रे असे एकूण अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

       घटनेची माहीती मिळाल्यानंतर तलाठी वैभव कोंडेकर, ग्रामसेवक अंकुश गाडेकर, सरपंच ज्ञानदेव गावडे, पोलिस पाटील कृष्णा सुतार, वीजतंत्री राजाराम देवेकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सदानंद गावडे, मोहन धुमाळे व पांडुरंग गावडे हे ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनाम्यानुसार शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment