दुकानदारांनी कोव्हीड टेस्ट न केल्यास दुकाने सील करणार - प्रांताधिकारी विजया पांगारकर - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2021

दुकानदारांनी कोव्हीड टेस्ट न केल्यास दुकाने सील करणार - प्रांताधिकारी विजया पांगारकर


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      सध्याचा लॉक डाऊन उठण्यापूर्वी चंदगड तालुक्यातील सर्व प्रकारच्या दुकानदारांनी अँटीजेन किंवा RT-PCR ही covid-19 संदर्भातील तपासणी केल्याशिवाय दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार नाही. अशा सक्त सूचना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिल्या. त्या कोवाड  (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचारी, कोरोना दक्षता कमिटी व आरोग्य विभाग यांच्या बैठकीत मार्गदर्शन करत होत्या. तहसीलदार विनोद रणवरे उपस्थित होते. 

    येत्या दोन-तीन दिवसात जिल्ह्याचा लॉकडाऊन खुला झाल्यास दुकाने उघडण्याची शक्यता आहे. तथापि तालुक्यातील हॉट स्पॉट म्हणून घोषित व अन्य गावातील किराणा भाजी, मेडिकल, पिठ गिरण्या, हॉटेल, खानावळी अशा जिथे ग्राहक जातात अशा सर्व प्रकारच्या दुकानदार किंवा विक्रेते व तेथील कामगारांनी आपली कोवीड टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. प्रशासन व दक्षता कमिटीने सांगूनही याचे उल्लंघन केल्यास पोलीस खात्याच्या सहाय्याने अशी दुकाने सील केली जातील, असा इशारा प्रांताधिकारी पांगारकर यांनी यावेळी दिला. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी असे कठोर उपाय योजण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

       कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक सूक्ष्म करणे, प्रत्येक गावातील सर्व व्यक्तींचा कुटुंबनिहाय सर्वे करणे, यात लसीकरण झालेले, न झालेले, कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी सर्वे सुरू नाही तिथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना आदेश काढून आशा, अंगणवाडी सेविका यांच्या  सहकार्याने येत्या आठवड्यात सलग तीन दिवसात सर्वे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

          यावेळी पावसाळा जवळ आलेला असल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षातील अनुभव विचारात घेता पुरामुळे कोवाड बाजारपेठ व इतर मालमत्ता हानी होऊ नये. यासाठी ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडल अधिकारी मगदूम, तलाठी दीपक कांबळे, ग्रामसेवक जी. एल. पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रामपंचायत व दक्षता कमिटी सदस्य, आशा, आरोग्य कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.No comments:

Post a Comment