बीज संकलन करून वृक्षारोपणाला हातभार लावूया - वर्ल्ड फॉर नेचर संस्था कोल्हापूर यांचा उपक्रम, काय आहे उपक्रम वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2021

बीज संकलन करून वृक्षारोपणाला हातभार लावूया - वर्ल्ड फॉर नेचर संस्था कोल्हापूर यांचा उपक्रम, काय आहे उपक्रम वाचा........

कोल्हापूर / प्रतिनिधी

        कोल्हापूर जिल्ह्यात आपण दरवर्षी अनेक निसर्गप्रेमी, निसर्गप्रेमी संस्था मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत असतो. आता पावसाळा जवळ येणार असल्यामुळे याची पूर्वतयारी करण्याची वेळ आली आहे.

       तसे पाहायला गेले तर निसर्गात खूप साऱ्या झाडांना बिया येतात, नैसर्गिकरित्या त्या जमिनीवर पडतात परंतु सर्व बिया रुजत नाहीत, कारण कडक ऊन, अवकाळी पाऊस, मातीचा अभाव व पोषक स्थितीची उपलब्धता नसल्यामुळे त्या नष्ट होतात. जर या बियांचे संकलन करून त्या योग्य पोषक स्थितीमध्ये रुजविल्या व त्याची रोपे तयार केली तर याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

              मग ती रोपे आपण इतरत्र योग्य ठिकाणी लावू शकतो, यासाठीच बीज संकलन व रोपण हा उपक्रम खूपच महत्वाचा ठरणार आहे. यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर विविध देशी वृक्षांच्या बिया संकलित करायची गरज आहे. आपल्या जवळपास असलेल्या दुर्मिळ व देशी वृक्ष्यांच्या बिया गोळा कराव्यात व बीज संकलन करावे ही नम्र विनंती. वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर मार्फत आपण या सर्व संकलित केलेल्या बियांची सीडबँक तयार करून त्या बियांची देवाण घेवाण करणार आहोत. 

       तरी सर्वांना नम्र निवेदन आहे की, या लॉकडाऊन काळात घरच्या घरी व घराच्या आसपासच्या परिसरात योग्य ती काळजी घेऊन आपल्या भागातील वैविध्यपूर्ण देशी वृक्ष्यांच्या बियांचे संकलन करावे व आमच्याशी संपर्क करून या बिया आमच्या सीडबँकेत जमा कराव्यात. आपण सर्वजण निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक आहात म्हणूनच या उपक्रमासाठी आपण आवडीने बीया संकलित करण्यासाठी सहाय्य करावे व आपणास आवश्यक असणार्‍या बीया तितक्याच हक्काने सीडबँकेतून घ्याव्यात ही नम्र विनंती.

      आम्ही सर्व वर्ल्ड फॉर नेचरचे सदस्य व सर्व निसर्गप्रेमी मिळून या सीडबँक उपक्रमाला हळूहळू व्यापक स्वरूप देणार आहोत. यामुळे वेगवेगळ्या बिया विविध निसर्गमित्रांच्या कडून मिळतील व त्या इतरांना पण पोहोच होतील व एकूणच निसर्ग संवर्धनासाठी याची खूप मदत होईल.आपणा सर्वांनाच योग्य त्या देशी वृक्षांच्या बिया योग्य वेळी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रोपनिर्मिती कार्यासाठी ही सीडबँक मोलाचे सहकार्य करेल. या लॉकडाऊन मध्ये स्वतःची काळजी घेत व सर्व नियम पाळून बिया संकलन करूया.

       सीड बँकेत बिया जमा करण्यासाठी व मिळवण्यासाठी whatsapp द्वारे खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावर मेसेज करावा आपणास यथावकाश प्रतिसाद दिला जाईल.

📲 9850339373 - अभिजीत वाघमोडे

📲 9356714314 - सुजित दळवी

📲 9403841959 - माधुरी पुजारी

📲 9822889315 - निलेश मुंगरे

📲 9834701467 - अभिजीत साळुंखे

        वर्ल्ड फॉर नेचर, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने जिल्ह्याचा हा सीडबँक उपक्रमाचा मुख्य उद्देश निसर्गाच्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन हा आहे तसेच इतर जिल्ह्यातील निसर्गप्रेमीसुद्धा या उपक्रमाचा लाभ घेवू शकता.




No comments:

Post a Comment