सरकारने काळजी घेतली असती तर पत्रकारांचे बळी टळले असते, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2021

सरकारने काळजी घेतली असती तर पत्रकारांचे बळी टळले असते, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन

आता पत्रकारांच्या अधिक बळींची वाट न पाहता प्रश्न मार्गी लावावेत, पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास राज्यभर प्रचंड प्रतिसाद

बीड जिल्ह्यातील देवडी या गावी असलेल्या ‘माणिक बाग’ या आपल्या फार्म हाऊसवर अन्नत्याग व आत्मक्लेष आंदोलन करतांना एस.एम. देशमुख

धुळे / प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त  एस.एम.देशमुख यांच्या आत्मक्लेष आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी 1 मे रोजी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनास उत्स्फुर्त आणि जोरदार प्रतिसाद मिळाला असून  राज्यभर हजारो पत्रकारांनी आपापल्या घरात बसूनच आंदोलन केले आणि दिवसभर अन्नत्याग केला.  पत्रकारांच्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची  राज्यभर चर्चा सुरू होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेने काही मागण्या केल्या होत्या.  त्यात सर्व वयोगटातील पत्रकारांना प्राधान्याने लस द्यावी, पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटरची सोय असलेले बेड राखीव ठेवावेत, पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर संबोधावे आणि दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना किमान पाच लाख रूपयांची मदत करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता. या मागण्यांसाठी पत्रकारांनी इमेल पाठवा आंदोलन देखील केले होते.  मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आत्मक्लेष आंदोलन करण्याचे ठरविले होते. एस. एम.देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी 1 मे रोजी राज्यभर आत्मक्लेष आंदोलन केले गेले. त्यात हजारो पत्रकारांनी कोविड चे आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून दिवसभर घरी आंदोलन केले. दिवसभर अन्नत्याग केला. स्वतः एस.एम.देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील देवडी या गावी असलेल्या माणिकबाग या आपल्या फार्मवर आत्मक्लेष आंदोलन केले. माणिकबागेत माध्यमांशी बोलताना एस.एम.देशमुख यांनी सरकारने पत्रकारांना वार्यावर सोडल्याचा आरोप केला. राज्यात कोरोनानं 122 पत्रकारांचे बळी घेतले आहेत, 5000 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत आणि किमान 300 पत्रकार राज्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.  सरकारने पत्रकारांची वेळीच काळजी घेतली असती तर एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांचे मृत्यू झाले नसते. आता वेळ न घालवता अधिक बळी जाण्याची वाट न पाहता  सरकारने पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. आपल्या आत्मक्लेष आंदोलनास पाठिंबा देत पत्रकारांनी राज्यभर आंदोलन करून आपली एकजूट आणि ताकद दाखविल्याबद्दल देशमुख यांनी राज्यातील सर्व पत्रकारांचे आभार मानले आहेत. राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांनी तहसिलदार, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना मागण्यांची निवेदने दिली. हिंगोलीत पत्रकारांनी धरणे आंदोलन केले. सातारा, बीड, वाशिम, नाशिक आदि अनेक  ठिकाणी वरिष्ठांना निवेदने दिली गेली. पत्रकारांनी एकजूट दाखवत आपली ताकद दाखवून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील सोशल मिडीया सेलचे प्रमूख बापूसाहेब गोरे प्रसिद्धी  प्रमुख अनिल महाजन यांनी राज्यातील पत्रकारांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment