गोकुळ निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शंभर टक्के शांततेत मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2021

गोकुळ निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शंभर टक्के शांततेत मतदान

गोकुळ निवडणूक मतदान केंद्रावर झालेली मतदारांची गर्दी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कोरोना काळातही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीसाठी आज चंदगड तालुक्यात शंभर टक्के शांततेत मतदान झाले. 

      मतदानासाठी प्रचंड प्रमाणात ईर्ष्या व चुरस दिसून येत होती.   निवडणुका जवळ आल्यानंतर ठराव धारकांना अज्ञात स्थळी ठेवले होते. या सर्व धारकांना थेट मतदानाला आज मतदान केंद्रावर घेऊन आले. दुपारी एकपर्यंत मतदान केंद्रावर कोणीही फिरकले नव्हते. त्यानंतर मात्र एकाच वेळी सत्ताधारी गटाच्या ५ आराम बस गाड्यातून मतदार आले. काही वेळाने विरोधी आघाडीच्या आराम बस मधून मतदार आले. त्यानंतर मात्र काहीवेळ मतदान केंद्रावर गर्दी झाली.

सत्ताधारी व विरोधी आघाडीचे नेते निवांत चर्चा करताना.


     गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले. ३४६ पैकी ३४६ मतदारांनी मतदान केले. ठराव धारकाने चंदगड येथील कन्या व कुमार विद्यामंदिरच्या  सहा मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले.  दुपारी बारा वाजता सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीचे  माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील,सचिन बल्लाळ यांच्यासमवेत ठरावधारक आले.  यावेळी सत्ताधारी गटाच्या ठराव धारकांनी पांढरी टोपी परिधान केली होती. तसेच तोंडाला पांढरे मास्क लावले होते.  मतदान केंद्रावर एकेक मतदारांना पाच मतपत्रिका असल्याने दहा मिनिटे वेळ लागत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विरोधी राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे  ठरावधारक आमदार राजेश पाटील यांच्यासमवेत मतदान केंद्रावर दाखल झाले.   ठराव धारकांनी पिवळे मास्क परिधान केले होते. दरम्यान दुपारी दोन वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,  खासदार संजय मंडलिक,  यांनी मतदान केंद्राला भेट दिली. चंदगड तालुक्‍यात एकूण ३४६  मतदारांपैकी ३४० मतदारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान केले.

६ ठरावधारक पॉझिटिव्ह

३४६ पैकीं ६ ठरावधारक अँटिजेंन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह निघाले. या पॉझिटिव्ह ठरावधारकाना शेवटच्या १ तासात पीपीई किट घालून मतदान करण्यास  दिले. हे सहा जण गेल्या चार दिवसांपासून अज्ञात स्थळी होते. ही बातमी समजताच त्यांच्याबरोबर राहिलेले ठरावधारक हबकले. पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दोन्हीं आघाड्यांचे दिग्गज नेते एकत्र बसले

मतदान केंद्राबाहेर उमेदवार सुश्मिता राजेश पाटील, गोकुळचे  संचालक दीपक पाटील, आ. राजेश पाटील, माजी जि. प. सदस्यां ज्योती पाटील एकत्र बसून चर्चा करीत बसले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया वरती  झाल्या.No comments:

Post a Comment