कोवाड बीट अंतर्गत विद्यार्थी पटनोंदणी आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2021

कोवाड बीट अंतर्गत विद्यार्थी पटनोंदणी आढावा

कोवाड बीट स्तरीय आढावा बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना एम टी कांबळे सोबत केंद्रप्रमुख डी आय पाटील, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील व गोविंद पाटील.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

     कोवाड (ता. चंदगड) बीट अंतर्गत सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली साठी पटनोंदणी आढावा बैठक नुकतीच केंद्र शाळा कोवाड येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे होते.

     स्वागत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केले. प्रास्ताविक  केंद्रप्रमुख डी. आय. पाटील यांनी केले. यावेळी कोवाड बीडमधील कोवाड, कालकुंद्री व कुदनुर या तीन केंद्रांचा गाववार पटनोंदणी आढावा घेण्यात आला. तिन्ही केंद्रातील एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून पटनोंदणी सर्वेक्षणात आढळलेल्या ३१ डिसेंबर २०२१ रोजी सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांपैकी ९७% उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित तीन टक्के विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे स्थलांतर अन्यत्र झाले आहे.

     याशिवाय जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत जिप. प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाइन बोधकथा, चिंतन, कविता, माझा वेगळा उपक्रम, व्यक्तिविशेष या विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बारा तालुक्यातून प्रत्येक विभागासाठी किमान दहा स्पर्धक सहभागी होणे अपेक्षित असताना चंदगड तालुक्यातून  स्पर्धकांची संख्या दहापेक्षा कमी होती. ती कोवाड बीटमधून शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवल्यामुळे पूर्ण झाली. सहभागी झालेल्या शिक्षकांचे एम टी कांबळे यांनी अभिनंदन केले. 

       यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रमुख गोविंद पाटील यांनी यावर्षी शासनाने अद्याप पाठ्यपुस्तके पुरवलेली नाहीत यामुळे पालक वर्गात नाराजी आहे. पाठ्यपुस्तके पुरवणे शक्य नसल्यास यावर्षीपासून पाठ्यपुस्तके दुकानात विक्री ठेवावीत अशी पालक आतून मागणी होत आहे. तसे निवेदन समन्वय समितीच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत आप्पाजी पाटील, विजय पाटील, भैरू भोगण आदींनी सहकार्य केले. यावेळी तिन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. आभार केंद्र समन्वयक विलास पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment