नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात ११० ग्रामपंचायतींना मंजूर ९२ ग्रामसेवकांच्या पदापैकी६९ ग्रामसेवक कार्यरत असून २३ पदे रिक्त आहेत.ग्रामसेवकांच्या रिक्त पदामुळे एका ग्रामसेवकांकडे दोन तीन ग्रामपंचायतीचा कार्यभार दिल्याने याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी जनतेतून होत आहे.
नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा तसेच गावच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर चालना देण्याची भूमिका पार पाडणारा प्रमुख घटक असलेल्या ग्रामसेवकांची मंजूर ९२पैकी तब्बल २३ पदे रिक्त असल्याने याचा साहजिकच गावच्या विकास कामांवर परिणार होत आहे. रिक्त पदांमुळे ज्या ग्रामसेवकांकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे. अशा ग्रामसेवकांना काम करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने लागू केलेली शनिवारची साप्ताहिक सुट्टी, रविवारची नियमित सुट्टी, सणावाराची सुट्टी, रजा, तालुकास्तरावरील नियमित बैठका आणि त्यातून ग्रामपंचायत कामकाजासाठी मिळणारे दिवस विचारात घेता एकापेक्षाअधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी असणाऱ्या ग्रामसेवकांनी गावच्या विकास कामांसाठी वेळ कसा द्यायचा हा प्रश्नच आहे. गेलेल्या वेळेला ग्रामसेवक भेटतीलच याची खात्री नसल्याने कामानिमित्त नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत विविध विभागांकडील रिक्त पदांचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. रिक्त पदे भरावीत या मागणीसाठी चार महिन्यांपूर्वी आमदार राजेश पाटील यांच्यासह पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्य तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. रिक्त पदांमुळे विकास कामे राबवताना येणाऱ्या अडचणींची माहिती देत त्वरित रिक्त पदे भरण्याची मागणी केली. परंतु ग्रामसेवकांची मंजूर ९२ पैकी २३ पदे अद्यापही रिक्त आहेत. दरम्यान, गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरतानाच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील आपला जास्तीत जास्त वेळ गावासाठी अर्थात ग्रामपंचायतीला द्यायला हवा.
No comments:
Post a Comment