महिनाभर कोरोनाशी झुंझ देत प्राथमिक शिक्षकाची पत्नीसह कोरोनावर मात - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2021

महिनाभर कोरोनाशी झुंझ देत प्राथमिक शिक्षकाची पत्नीसह कोरोनावर मात

 

श्रीकांत पाटील यांच्या सपत्नीक डिस्चार्ज प्रसंगी सेंटरमधील डॉ. एस एल जाधव, डॉ.आर डी पाटील व स्टाफ.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        कोरोना पॉझिटिव झाल्यानंतर पूर्ण महिनाभर सुरू असलेल्या आशा निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत एका प्राथमिक शिक्षकाने आपल्या सौभाग्यवती सोबत खतरनाक कोरोना वर मात केली.

        म्‍हाळेवाडी (ता. चंदगड) येथील रहिवासी व कोवाड केंद्रातील जक्कनहट्टी शाळेचे अध्यापक श्रीकांत सुबराव पाटील व त्यांची पत्नी श्रुतिका यांनी महिनाभर कोरोनाशी दिलेली झुंज अंगावर शहारे आणणारी आहे. शाळेच्या गावात त्यांना कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ची ड्युटी होती. यातून नकळत कोरोना बाधित झाले. त्यांच्या संपर्कातील पत्नी, मुलगा व मुलगी असे चारही जण एकदम कोरोनाच्या विळख्यात सापडले व चौघांच्या जीवन-मरणाचा खेळ सुरू झाला. पाच मे रोजी पॉझिटिव्ह झाल्यानंतर पहिले तीन दिवस चंदगड व त्यानंतर गडहिंग्लज शेंद्री माळ येथील निर्भय कोव्हीड सेंटरमध्ये पती, पत्नी व मुलगा यांना दाखल केले. मुलगा आठ दिवसात कोरोना मुक्त झाला. मुलगी चंदगड रुग्णालयातील उपचाराने घरीच बरी झाली. तथापि पती-पत्नींचा ५ मे ते ४ जून असा महिनाभर संघर्ष सुरू होता. कोव्हीशिल्ड चा एक डोस घेतलेले पाटील ३० पैकी २४ दिवस दक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होते. अखेर कोरोना वर यशस्वी मात करून याची देही याची डोळा घरी परतले. डिस्चार्ज देताना सेंटर चे डॉक्टर व स्टाफ यांना त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही.

          पाटील कुटुंबीयांचे कोवाड केंद्रातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोनाची भयानकता काय आहे हे सांगून सर्वानी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. या कामी त्यांना वैद्यकीय अधिकारी यांच्यासह भाऊ नारायण सुबराव पाटील यांची मोलाची साथ लाभली.

No comments:

Post a Comment