स्वतंत्र विलगिकरण कक्षाचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उदघाटन, तालुक्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविणारे सरपंच कोण? - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2021

स्वतंत्र विलगिकरण कक्षाचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उदघाटन, तालुक्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविणारे सरपंच कोण?

शिनोळी औद्योगिक वसाहतीमध्ये कोवीड-19 अलगीकरण कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील,जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, सह. संपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे व इतर.

कागणी : एस. एल. तारिहाळकर / सी. एल. वृत्तसेवा

       शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे सरपंच नितीन पाटील यांच्या पुढाकाराने २० बेडचा स्वतंत्र कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. तालुक्यात अशा प्रकारे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला हा पहिलाच प्रयोग असून सर्वत्र कौतुक होत आहे.

          या कक्षाचे उद्घाटन शनिवारी दि. ५ जून रोजी कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले.उद्घाटन समारंभाला आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, प्रा. सुनील शिंत्रे, चंदगडचे तहसीलदार विनोद रणावरे, पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

          गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच नितीन पाटील, उपसरपंच रघुनाथ गुडेकर, ग्रा.प.सदस्य अमृत जत्ती, ग्रामसेवक महादेव पाटील यांनी या कक्षाचे नेटके नियोजन केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम आदर्शवत असून शिनोळी परिसरातील नागरिकांसाठी तसेच औद्योगिक कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

           प्रा. संजय मंडलिक म्हणाले ``सरपंच नितीन पाटील यांनी हा कक्ष उभा करून आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतस्तरावर संस्थात्मक विलगिकरण कक्ष  स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार याठिकाणी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या  कोरोनाबाधित रुग्णांना येथे आवश्यक सुविधा मिळणार आहेत. 

         यावेळी सरपंच नितीन पाटील यांनी ``ग्रामपंचायत स्तरावर सद्या २० बेड व औषधे उपलब्ध केली असून येत्या 8 दिवसात 2 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

        विलगीकरण कक्षात सर्व आवश्यक सुविधा उभारल्या आहेत. परिसर स्वच्छ असून लाईट तसेच स्वच्छतागृहे ही प्रशस्त आहेत. या ठिकाणी बेड, अंथरूण-पांघरूण आदी साहित्य नव्याने खरेदी केले आहे. येथे प्राथमिक टप्प्यात लागणाऱ्या औषधांचाही पुरवठा केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment