चंदगड तालुक्‍यात मान्सूनची दमदार सलामी, धुळवाफ पेरण्या मार्गी, कोरवाफेची धांदल - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2021

चंदगड तालुक्‍यात मान्सूनची दमदार सलामी, धुळवाफ पेरण्या मार्गी, कोरवाफेची धांदल

 

भाताच्या कोरवाफ पेरणीसाठी सहकुटुंब शिवारात निघालेला कालकुंद्री येथील शेतकरी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
       काल मान्सूनपूर्व पावसाने चंदगड तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली होती तथापि  बळीराजाला या पावसाने भाताच्या धूळवाफ पेरण्यांची १०० टक्के उगवण होईल याची खात्री नव्हती. मात्र आज ४ जून रोजी सकाळपासून  पावसाच्या दमदार हजेरीने धूळवाफ पेरण्यांची उगवण खात्रीलायक होणार आहे. मान्सून च्या या यशस्वी सलामीने  बळीराजा सुखावला आहे.
      कुरीच्या सहाय्याने होणाऱ्या धुळवाफ पेरण्या चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे माणगाव पासून म्हाळेवाडी, निटुर, नागरदळे, किणी, कोवाड, कालकुंद्री, कुदनुर, ते राजगोळी खुर्द या पट्ट्यात पावसापूर्वी केल्या जातात. या परिसरात  पश्चिमेच्या तुलनेत निम्म्याहून कमी पर्जन्यमान आहे. पश्चिम भागात शक्यतो जुलै महिन्यात चिखलातील भात रोप लावणी केली जाते.
       यंदा एप्रिल व मे महिन्यात अधून मधून पडणारा पाऊस व कोरोनाच्या दहशतीमुळे बळीराजाला अंतर्गत मशागतीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे पूर्व भागातील पेरण्या काहीशा रखडल्या आहेत. दरम्यान आज सकाळी ११ नंतर उघडीप मिळताच कोरवाफ पद्धतीने पेरणीची धांदल सुरू झाली. तर काही शेतकऱ्यांनी जुलैमध्ये चिखलात रोप लावणीची मानसिकता  केली आहे. पश्चिम भागात भात रोपांसाठी तरवे टाकण्या साठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत गारपीट, तोक्ते वादळाची तीव्रता कमी व गरजेनुसार पाऊस यामुळे उत्साहित झालेल्या चंदगड मधील बळीराजाची फक्त खतांचे दर कमी व्हावेत ही  माफक अपेक्षा आहे.


No comments:

Post a Comment