फादर्स डे स्पेशल - शेतमजूर बापाची व्यथा........कवितेतून........वाचा हि कविता....... - चंदगड लाईव्ह न्युज

20 June 2021

फादर्स डे स्पेशल - शेतमजूर बापाची व्यथा........कवितेतून........वाचा हि कविता.......

कवी - प्रा. डॉ. बी. जी. खाडे


                         कवितेचे नाव - शेतमजूर बाप 


वरून सावळा आतून गोड 

बाक आलेल्या तोडणीच्या उसासारखा 
काटक माझा शेतमजूर बाप
उतारवयात राहिला गुऱ्हाळात
 सावकाराच्या
अन्
 गुऱ्हाळ केलं त्यांना आयुष्याचं स्वतःच्या.

 कधी कधी घालत राहिला ऊस
 रात्रंदिवस चाकात दोन घाण्याच्या 
लाखो चिप्पाडं केली त्यानं 
बाजूला सारून रस जीवनातील उसांच्या 
अन्
एक दिवस स्वतःच  झाला चिप्पाड 
रसहीन ऊसासारखा.

सातत्यानं दिवसभर 
तळपत्या सुर्याखाली रणरणत्या उन्हात 
सुकवत राहिला चिप्पाडं
 आलटून पालटून आकडीनं
 जाळण्यासाठी चुलानात,
अन् 
सुकत राहिला स्वतःही 
जळण्याआधी इतरांसाठी 
चिप्पाडांसारखा.

 सरतेशेवटी आयुष्याच्या 
कमी झाली शक्ती चिप्पाडं उचलण्याची 
म्हणून
 काम दिलं सावकारांनं 
मारायचं चुलाण गुऱ्हाळाचं.
थरथरत्या हातांनी
 सुकलेली चिपाडं
 हळुवार उचलत 
चुलाण मारलं त्यांनं
 सुरकुतलेल्या चेहऱ्यातील
 लुकलुकत्या डोळ्यांनी
भगभगते चुलान
आशेने पहात 
नाईलाजानं.

 सुकलेली चिप्पाडं
जाळत राहिला चुलानात 
काहिलीतील रसाचा 
गुळ होईपर्यंत सातत्यानं
 पुरणपोळी खाणाऱ्या 
उच्चभ्रू समाजातील खवय्यांसाठी,
 आणि 
ढेपा विकून गुळाच्या
 गब्बर होणाऱ्या सावकारांसाठी,
 अन् शेवटी
 जळत राहिला स्वतःही
 धगधगत्या चुलानातील
 परोपकारी चिप्पाडांसारखा
 राखोळी होऊन 
मातीत मिसळेपर्यंत अखंडित.....

कवी - प्रा. डॉ. बी. जी. खाडे

(शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल / कागणी ता. चंदगड, जि. कोल्हापूर), मो. 9833987546.



1 comment:

RAMAKANT SHANKAR BANDEKAR said...

My dear friend,. The above poem you wrote is touching one. Let me know if you have written this poem on the occasion of Father's day. If yes it is a tribute to not only to the particular father but also to every father who does everything for his family, therefore I salute you for that. I am Raman, your friend from Gadhinglaj

Post a Comment