कोवाड लसीकरण केंद्रावर सकाळी साडेचार पासून लसीकरणासाठी रांगा - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2021

कोवाड लसीकरण केंद्रावर सकाळी साडेचार पासून लसीकरणासाठी रांगा

कोवाड येथे लसीकरणाच्या प्रतीक्षेत थांबलेल्या नागरिकांची गर्दी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

          आठवड्यातून एकदा येणारे शे-दोनशे कोरोना लसीचे डोस आणि घेणाऱ्यांची संख्या हजारात! अशा व्यस्त प्रमाणामुळे कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या वेळी गर्दी होत आहे. 

          शनिवार दि. ३ रोजी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ आणि ढकलाढकलीमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. गर्दीला शिस्त लावण्यासाठी कर्मचारी अपुरे पडू लागल्यानंतर बाजूलाच असलेल्या पोलीस स्टेशन मधून पोलीस व होमगार्डना पाचारण करण्यात आले. पण गर्दीने त्यांनाही जुमानले नाही. येथे ड्युटीवर असलेल्या नर्सच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार यावेळी घडल्याचे सांगण्यात आले. लसीकरणाची वेळ सकाळी दहा असली तरी सकाळी साडेचार वाजताच लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. पहाटेपासून झालेल्या गर्दीची माहिती मिळताच आरोग्य कर्मचारी व ड्युटीवरील प्राथमिक शिक्षक यांनी नाईलाजास्तव साडे आठ पूर्वीच लसीकरणाला सुरुवात केली. गेल्या दोन अडीच महिन्यात वारंवार घडणाऱ्या अशा  प्रकारांमुळे हतबल झालेले आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुरेसे डोस आल्याशिवाय कोवाड येथे लसीकरण ठेवू नये. अशी मागणी केली आहे. तर बाहेर रांगेत उभे राहिलेले नागरिक आरोग्य केंद्रातील गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गावात  लसीकरणाचे आयोजन करावे अशी मागणी करत होते.

    वरील प्रकार पाहता कोरोना चा वाढता प्रादुर्भाव, काहींसाठी पहिल्या लसीचा पत्ता नाही तर पहिली लस घेऊन ८४ ऐवजी ९०-१०० दिवस झाले तरी दुसरा डोस मिळत नाही.  १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा मागमूसही नाही. लसींच्या ठणठणाटामुळे व्यक्त होत असलेला संताप लक्षात घेऊन शासनाने पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

                    महाविद्यालयीन तरूणांना आर्थिक फटका

              महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील बहुतांशी महाविद्यालये सुरू झाली असली तरी लस घेतल्याशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे खिशाला न परवडणारे खाजगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यावे लागत आहे. किंवा कॉलेजच्या अभ्यासावर पाणी सोडावे लागत आहे. अशा कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना शासन लसीकरण उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

No comments:

Post a Comment