व्हाट्सअप ग्रुपवरील आवाहनला प्रतिसाद, ग्रामस्थांची गरीब कुटुंबाला अडीज लाखांची मदत, कोणत्या गावात..........वाचा....... - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2021

व्हाट्सअप ग्रुपवरील आवाहनला प्रतिसाद, ग्रामस्थांची गरीब कुटुंबाला अडीज लाखांची मदत, कोणत्या गावात..........वाचा.......

म्हाळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कै. अमृत दळवींच्या कुटुंबियाकडे निधी सुपर्द करताना सरपंच सी. ए.पाटील, आमदार राजेश पाटील व ग्रामस्थ.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील कै. अमृत धोंडिबा दळवी नावाच्या तरुणाचे पुणे येथे काही दिवसापूर्वीच दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर गरीब परिस्थितीशी सामना करणाऱ्या या दळवी कुंटूंबियांना २ लाख ५१  हजारांची देणगी म्हाळेवाडी ग्रामस्थांनी दिली.
      कै. अमृत दळवी पुण्यात खाजगी नोकरीला होते. त्याच्या पश्चात आई - वडिल, पत्नी व दोन मुलगे आहेत. घरातला कर्ता मुलगाच अचानकपणे निघून गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असलेल्या या कुटुंबाला आधार मिळावा. तसेच कै. अमृत याच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा. या हेतूने म्हाळेवाडीचे सरपंच  सी. ए. पाटील  यांनी वॉट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग व मित्रमंडळी यांना मदत निधी संकलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गावातील आणि गावाबाहेरील मित्रमंडळी, मान्यवर व्यक्ती, कै. अमृत दळवीचे वर्गमित्र तसेच आमदार राजेश पाटील या सर्वांनी केलेल्या मदतीतून रुपये  २,५१,००० /- इतका निधी जमा झाला. तो आमदार राजेश पाटील यांच्या बरोबरच कै. अमृतचे मित्र  विठोबा पाटील,  सुनील दळवी यांच्या हस्ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती  भरमू पाटील,  विठ्ठल पाटील,  एन. आर. पाटील, रघुनाथ पाटील, गोपाळ दळवी, गुरुनाथ दळवी, गुंडू कोकितकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक चिलमी, पोलिस पाटील, सुभाष नांदवडेकर, शिवाजी पाटील, निंगाप्पा दळवी, सुनिल कांबळे इत्यादींच्या उपस्थितीत कै. अमृत दळवी यांच्या कुटुंबियांकडे नुकताच सुपुर्द करण्यात आला. माणूसकी जपणार्‍या व दळवी कुटुंबाला आधार देणार्‍या म्हाळेवाडीतील ग्रामस्थांच्या या आदर्शवत कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment