![]() |
जेसीबी यंत्राद्वारे पाण्याला वाट करून देताना सरपंच विलास सुतार. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चार दिवसापूर्वी तालुक्यात चंदगड तालुक्यात हाहाकार माजवलेल्या अतिवृष्टीत शेती, घरे, दुकाने, जनावरांचे गोठे, वैरण आदींचे अतोनात नुकसान झाले. काही जणांचा ओढ्यातून वाहून जाऊन मृत्यु झाला. अशावेळी आपले गाव, गावातील घरे सुरक्षित रहावी यासाठी एक सरपंच धडपडत होते. त्यांच्या धाडस व समयसूचकतेचे कौतुक पंचक्रोशीत होताना दिसत आहे. हे आहेत तुडये (ता. चंदगड) गावचे कर्तव्यदक्ष सरपंच विलास सुतार.
अतिवृष्टीमुळे गावच्या दक्षिणेकडील उंच भागातील पाणी ओढे-नाले व गावातील गटारे भरून घराघरात शिरत होते. ते सुरक्षित न वळवल्यास घरांचे मोठे नुकसान अटळ होते. गावात जेसीबी मशीन होते पण ऑपरेटर नव्हता अशावेळी स्वत: ऑपरेटर बनून मोठा पाण्याचा झोत त्यांनी अन्यत्र वळवला. यामुळे धोक्यात आलेली अनेक घरे पर्यायाने गाव सुरक्षित राहीला. प्रसंगावधान राखून सुतार यांनी केलेल्या कामाचे तालुक्यात कौतुक होत आहे. याकामी त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी कांबळे, हणमंत कोलकर सामाजिक कार्यकर्ते रजत हुलजी आदिंची मोलाची साथ लाभली.
No comments:
Post a Comment