दौलत तथा अथर्व इंटरट्रेड व इको शुगरकेन म्हाळुंगे कारखान्यांनी ऊसबिलाचा 200 रुपयांचा दुसरा हप्ता गणपती सणापूर्वी द्यावा, उत्पादकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2021

दौलत तथा अथर्व इंटरट्रेड व इको शुगरकेन म्हाळुंगे कारखान्यांनी ऊसबिलाचा 200 रुपयांचा दुसरा हप्ता गणपती सणापूर्वी द्यावा, उत्पादकांची मागणी

        

संग्रहित छायाचित्र

तुर्केवाडी / एम. के. पाटील (सी. एल. वृत्तसेवा)

         गेल्या गळीत हंगामात दौलत तथा  अथर्व इटरट्रेड कंपनीने व इको केन शुगर म्हाळुंगे यांनी पहीला हप्ता  २८०० रुपये प्रतिटन  शेतकऱ्यांना दिला आहे. तथापि ओलम म्हणजेच हेमरस शुगरने मात्र पहील्याच हप्त्यात २९८५ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. एफआरपी दिली म्हणजे विषय संपला असे कारखान्यांनी समजू नये. एक कारखाना इथल्याच उसाला २०० रुपये जास्त देऊ शकत असेल तर इतर दोन कारखाने का देत नाहीत हा प्रश्न महत्वाचा आहे. ऊस पिकावर होणारा एकूण खर्च पाहता शेतकरी आज संकटात आहे. हुमणीने जवळपास ऊसाचे संपूर्ण क्षेत्र व्यापले आहे. डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहेत यामुळे मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. ऊस पिक टिकवण्यासाठी विविध प्रकारची औषधे वापरावी लागत आहेत. मावा अधूनमधून डोके वर काढत आहे.   फवारणी, मजुरांचा तुटवडा, ऊसतोड मजुरांची खुशाली, इंट्री, मजुरीचे वाढलेले दर या सर्वांशी झुंझताना शेतकरी मेटाकुटीस आला आहे.  खतांचे दर प्रचंड वाढले आहेत. हुमणी शेतकऱ्यांच्या मानगुटिवर बसली आहे. हुमणीपासुन ऊस वाचवता वाचवता शेतकऱ्यांचा कणा वाकुन आला आहे. एकूण ऊस शेतीच्या प्रयोगशीलतेचा दर अमाप वाढला आहे.

            कोरोना काळात इतर पिकांनाही दर मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँका, सोसायट्यांची व पतसंस्थांची घेतलेली कर्जे संपून पुन्हा सणावाराला त्यांना दुसऱ्याच्या दारात उभे राहायची वेळ आली आहे. दुसऱ्या हप्त्याच्या रुपाने आम्हाला कोणाचे पैसे नको आहेत तर आम्ही आमच्या घामाचे दाम मागत आहोत. दौलत बाबतीत मोठा त्याग आम्ही शेतकऱ्यांनी केलेला आहे. आमचा कारखाना आम्ही कोणाच्यातरी गैरकारभारामुळे गमावून बसलो आहोत. आमच्या  ठेवी आणि सर्वाला आम्ही कायमचे मुकलो आहोत. दौलत संबंधित सर्व अर्थपुरवठादार  संस्था अडचणीत आल्या होत्या. त्या काळापासून शेतकऱ्यांची पत कमी झालेली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी दौलत बाबतीत मोठा त्याग केलेला आहे. कोणीतरी केलेल्या पापाचे परिणाम आम्ही भोगत आहोत. 

       आत्ता आम्हाला या सर्व गोष्टीत स्वारस्य नाही. साखर कारखानदारीच्या राजकारणातही आम्हाला आत्ता रस राहीला नाही. तालुक्यातील तिन्ही कारखाने आत्ता खाजगी  व्यवस्थापन चालवत असल्याने त्या ठिकाणी राजकारण करण्याचा आमचा प्रांतही उरलेला नाही. पण आम्हाला आत्ता स्पर्धेतला दर हवा आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी दौलत, ओलम व इकोकेनवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. येथुनमागे झालेल्या नुकसानीचा विचार न करता शेतकरी आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहिल पण त्याच्या घामाचे दाम त्याला मिळाले पाहिजे. इथला ऊस उत्पादक शेतकरी दिलदार आहे. शिवाय तो अगतिकही आहे. पण त्याच्या अगतिकतेचा कोणी  गैरफायदा घेऊ नये. शेतकरी दौलत बाबतीत नेहमीच उदार राहीला आहे.

            या तालुक्यातील तिन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने चालले पाहिजे हिच इथल्या शेतकऱ्यांची मनोधारणा आहे. दौलत चालवायला घेत असताना अथर्वला अनेक समस्यांना समोरे जावे लागले याची जाणीव आम्हाला आहे. पण तो कारखाना खासगी व्यवस्थापनाकडे जाईना का पण त्या व्यवस्थापणाने स्पर्धेतला दर दिला पाहिजे अशी इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांची धारणा होती. म्हणून शेतकरी त्या काळात कंपनीसोबत राहीला. साखर उद्योगासमोर जसे अनेक कठीण प्रश्न आहेत त्यापेक्षा कितीतरी कठीण समस्यांचा सामना प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी करत असतो. वास्तवात ऊस उत्पादक शेतकरी हाच तुमचा आधार आणि भांडवल आहे. बाकी कोण नेतेमंडळी आपल्या सोबत आहेत याला महत्व नाही. जर आपण शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम दिला तर शेतकरी सदैव आपल्या सोबत असेल. इथल्या शेतकऱ्यांचे शोषण ज्यांनी ज्यांनी केले ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. नियती योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार न्यायनिवाडा करत असते. ओलम शुगरनेही आणखी काही रक्कम देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी. इको शुगरकेन म्हाळुंगे व दौलत तथा अथर्व इटरट्रेड कंपनीने येत्या गणपती सणापूर्वी २०० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा ही समस्त ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्यावतीने मागणी करत आहोत.

No comments:

Post a Comment