पारगड जंगलक्षेत्र नजीक दोडामार्ग तालुक्यात प्रथमच सापडला 'किंग क्रोब्रा' - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2021

पारगड जंगलक्षेत्र नजीक दोडामार्ग तालुक्यात प्रथमच सापडला 'किंग क्रोब्रा'

 

दोडामार्ग तालुक्यात प्रथमच सापडलेल्या किंग कोब्रा ला तिलारी राखीव जंगलात सोडताना राहुल निरलगी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड नजीक दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावाच्या हद्दीत १२ फूट लांबीचा काळाकभिन्न 'किंग कोब्रा' नाग सापडल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. 

       नागपंचमीच्या पूर्वसंध्येला दिनांक ८ ऑगस्ट रोजी वझरे गावानजीक जंगल क्षेत्रातील बांबूच्या बेटीवर बसलेला हा महाकाय, जगातील सर्वात विषारी समजला जाणारा किंग कोब्रा (ओफिओफॅगस हन्ना) दिसला. बराच वेळ तो तिथेच बसून राहिल्यामुळे तो बेटामध्ये अडकला असावा असा कयास बांधला. त्यानंतर ग्रामस्थांनी  दोडामार्ग बाजारपेठेतील वन्यजीव बचावकर्ता व सर्पमित्र राहुल निरलगी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ वन विभाग अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अडचणीत सापडलेल्या किंग कोब्रा सुरक्षित बाहेर काढले. नंतर भारत सर्पमित्र टीम व वन अधिकारी यांच्या उपस्थितीत तिलारी राखीव जंगल क्षेत्रात सोडून दिले. त्यांच्या या अतीव धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी त्यांनी शेकडो सापांना जीवदान दिले असले तरी किंग कोब्रा पकडण्याची राहूल यांची ही पहिलीच वेळ होती.

          कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेल्या गोवा व कर्नाटकातील खानापूर तालुक्यात किंग कोब्रांचा अधिवास आहे. तथापि सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात किंग कोब्रा आढळण्याची ही पहिलीच व महाराष्ट्रातील दुर्मिळ घटना असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

           'एसएआरआरपी इंडिया' प्रशासनच्या चित्रा पेडणेकर यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. किल्ले पारगड परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा किंग कोब्रा चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments:

Post a Comment