नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीची सुवर्णसंधी, आगामी जि.प., पं. स. निवडणुकीसाठी ठरणार पात्र - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीची सुवर्णसंधी, आगामी जि.प., पं. स. निवडणुकीसाठी ठरणार पात्र


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र निवडणूक आयोगाने 'मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम' हाती घेतला आहे. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार केली जाणार असून ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. या यादीत नोंद असलेल्या मतदारांनाच येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क प्राप्त होईल. अशी माहिती नूतन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड चे तहसीलदार विनोद रणवरे यांनी दि. २७ रोजी झालेल्या बीएलओ व पर्यवेक्षक यांच्या ऑनलाईन (व्हीसी) मिटिंगमध्ये मार्गदर्शन करताना दिली.

             ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी ज्यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहेत. अशी सर्व मुले, मुली मतदार नोंदणी साठी पात्र ठरतील. या विशेष मोहिमेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- दिनांक ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ अखेर नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार किंवा समान नोंदी, एकाच मतदाराच्या एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी ( मतदाराचे छायाचित्र, ओळखपत्र क्रमांक, नाव, एकाच घरातील/ कुटुंबातील  सर्व मतदारांची नावे एकाच यादीत करणे, इत्यादी) दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे द्वारा घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, योग्यप्रकारे विभाग तयार करून मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे.

          १ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी  एकत्रीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करणे. १ ते ३० नोव्हेंबर पर्यंत प्रारुप यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे. २० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. तर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

           विशेष पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करणे व मतदार जागरूकता मोहीम आयोजनासाठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, महाविद्यालये व त्यातील विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनांनी सहकार्यासाठी पुढे यावे. तसेच नवीन मतदार नोंदणी दुरुस्तीसाठी योग्य त्या कागदपत्रांसह केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बी एल ओ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी वाघमोडे व तहसीलदार विनोद रणवरे यांनी यावेळी केले. यावेळी तालुक्यातील सर्व बी एल ओ व पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निहाल मुल्ला यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment