![]() |
माणगाव फाटा ते कारवे दरम्यान वेंगुर्ला महामार्गावरील वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत असलेले ठिकाण. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
वेंगुर्ला- बेळगाव राज्यमार्गावर माणगाव फाटा नजीक अपूर्ण डांबरी साईडपट्ट्या वाहनधारकांसाठी धोकादायक बनल्या आहेत. हे ठिकाण गेल्या काही महिन्यांपासून अपघातांना आमंत्रण देत असून कारवे कडील बाजूस साईड पट्ट्या वाढवून रस्ता निर्धोक करण्याची मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिक, व्यापारी, दुकानदार व उद्योजकांनी केली आहे.
पाटणे फाटा ते माणगाव फाटा (ता. चंदगड) दरम्यान वेंगुर्ले-बेळगाव रस्त्याचे दोन वर्षापूर्वी रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. तथापि माणगाव फाटा पासून कारवेकडे जाणाऱ्या उतारावरील रस्त्याची रुंदी वाढवलेल्या साईड पट्ट्या अर्धवट करून सोडून देण्यात आल्या आहेत. या साईड पट्ट्यांचा पुढील भाग मातीचा असल्याने खचून मोठा खड्डा तयार झाला आहे. बहुतांश वेळा चंदगड कडून बेळगावकडे जाणारी दुचाकी, चारचाकी वाहने वेगात असतात. या साईडपट्टी वरून जाताना अशी वाहने अंदाज नसल्याने साईडपट्टी संपताच पुढील खड्ड्यात पडतात. अनेक वेळा दुचाकीस्वार या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत. अपघात घडताच नजीकच्या दुकानदारांना अपघातग्रस्तांच्या मदतीला धावावे लागते. सध्या अशा घटनांची मालिका सुरू आहे. याबरोबरच येथील मुख्य रस्त्याचीही बाजू एक फुटाने खोल गेल्यामुळे अपघातांची तीव्रता अधिकच वाढली आहे. या ठिकाणचा धोका ओळखून संबंधित बांधकाम विभागाने येथे दुरुस्तीसाठी तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment