अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनास कलाकाराची रांगोळीतून सलामी, कोण आहे हा कलाकार......... - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनास कलाकाराची रांगोळीतून सलामी, कोण आहे हा कलाकार.........

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त अजित औरवाडकर बेळगाव यांनी टाकलेली रांगोळी कलाकृती

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          बेळगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी (७५ व्या) भारतीय स्वतंत्रता दिन अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभक्त, क्रांतिकारकांना रांगोळीतून अभिवादन केले. ३×६ फूट आकाराच्या रांगोळीत लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी व राष्ट्रध्वज रेखाटून ७५ पणतींची आकर्षक सजावट केली आहे. अजित यांना यासाठी तब्बल २१ तास लागले. रांगोळी साठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, माधवपूर- वडगाव बेळगाव येथील ज्योती स्टुडिओत १५ ते २० ऑगस्ट दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.

          अजित यांची ही १२५ वी रांगोळी कलाकृती असून त्यांनी यापूर्वी पाण्यावर तरंगणाऱ्या रंगोळी सह भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, लता मंगेशकर, सनई वादक बिस्मिल्ला खान, वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, एपीजे अब्दुल कलाम, अण्णा हजारे आदी नेते, देशभक्त, क्रांतिकारक, कलाकारांच्या तसेच बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक सामाजिक प्रश्नावरील रांगोळ्या कलाप्रेमी रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. त्यांना याकामी कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

No comments:

Post a Comment