जि. प. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश व स्वाध्याय पुस्तिका मिळाव्यात - डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2021

जि. प. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश व स्वाध्याय पुस्तिका मिळाव्यात - डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची मागणी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

              जिल्हा परिषद शाळांतील सर्व मुली व अनुसूचित जाती, जमातीच्या मुलांना गेल्या काही वर्षापासून गणवेश दिले जातात. या लाभापासून ओबीसी, विमुक्त व मराठा खुल्या जातीतील गरीब मुले वंचित राहून त्यांच्यावर अन्याय होतो. हे टाळण्यासाठी सरसकट गणवेश वाटप व्हावे. आदी मागण्यांचे निवेदन शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (महाराष्ट्र) शाखा कोल्हापूरच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना नुकतेच देण्यात आले.

           निवेदनात शासनामार्फत शाळांना क्रीडा, संगीत, विज्ञान,, लेखन आदी साहित्य, पुस्तके दिली जातात. या साहित्याची शाळेतील रजिस्टरमध्ये नोंद होते. बदलीच्या वेळी चार्ज देताना असे वापरून खराब किंवा गहाळ साहित्य बदलून जाणाऱ्या मुख्याध्यापकांवर नवीन खरेदी करून देण्याची सक्ती होते. यात पुढील त्रास टाळण्यासाठी साहित्य पूर्ण क्षमतेने वापरण्यात टाळाटाळ होण्याची शक्यता असते त्यामुळे असे साहित्य महत्त्वाच्या रजिस्टर ऐवजी साध्या रजिस्टरमध्ये नोंदविण्यास परवानगी मिळावी व वापरून खराब झालेले साहित्य शाळा समिती स्‍तरावर निर्लेखित करून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांच्या भेटी किंवा वार्षिक शाळा तपासणी वेळी रजिस्टर मधून कमी करण्यात यावे. याशिवाय  विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांसोबत स्वाध्याय पुस्तिकाही मिळाव्यात, शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लावावा. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

           निवेदन सादर करताना परिषदेचे प्राथमिक जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सरचिटणीस डी. के. देसाई, कोषाध्यक्ष नंदकुमार पाटील, माध्यमिक अध्यक्ष राजेंद्र यादव, सरचिटणीस ए. पी. धबधबे आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment