कामेवाडी येथे 'विश्व आदिवासी दिन' यानिमित्त चंदगड तालुक्यातील आदिवासींच्या वास्तव्याबाबत घेतलेला आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2021

कामेवाडी येथे 'विश्व आदिवासी दिन' यानिमित्त चंदगड तालुक्यातील आदिवासींच्या वास्तव्याबाबत घेतलेला आढावा

कामेवाडी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झालेले आदिवासी बांधव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कामेवाडी (ता. चंदगड) येथे महादेवकोळी जमातीच्या वतीने विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमात मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      विश्व आदिवासी दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी जमाती विषयी आणि त्यांच्या वास्तव्या विषयी पत्रकार श्रीकांत पाटील कालकुंद्री यांनी घेतलेला आढावा.

        आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, इतराशी संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने किंबहुना ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव! अर्थात आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासीच आहे. आदिवासी आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करायचा. आजही आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. 'आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’  ही संकल्पना यामुळेच दृढ झालेली आहे. निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, 'मूळनिवासी' असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत. ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्य करतात. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४- २००५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरे करण्यात आले.  महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतात नाशिक पासून चंदगड पर्यंत महादेवकोळी जमातीचे लोक राहतात. आदिवासी हे पुर्वाश्रमीचे हिंदू नसून ते निसर्गपूजक आहेत. असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी दिला आहे. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. क्रांतिकारक राघोजी भांगरे, विरांगणा राणी दुर्गावती, राणी झलकारी यांची शासकीय पाठ्यपुस्तक मंडळाने दखल घेण्याची गरज आहे. चंदगड तालुक्यातील चिंचणे- कामेवाडीतील अनेक आदिवासींनी जंगल सत्याग्रह व १९४२ च्या आंदोलनात सहभाग नोंदवलेला होता. या चळवळीतील सहभागामुळे हिंडलगा (बेळगाव) येथील कारागृहात शिक्षा भोगल्याच्या नोंदी आहेत. येथील महादेवकोळी जमातीची जनगणना १९३१ आणि १९४१ च्या जनगणेत स्पस्ट नोंदी आहेत. या महादेवकोळी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणीप्रित्यर्थ चंदगडच्या पंचायत समितीसमोर सन १९६२ साली शासनाने बांधलेला स्तंभ आहे. 

            चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगराळ व जंगल परिसरातील चिंचणे कामेवाडी चे महादेवकोळी आदिवासी लोक दरवर्षी विश्व आदिवासी दिन व आदिवासींशी संबंधित सण उत्सव साजरे करतात. 

No comments:

Post a Comment