हजारो रुग्णांना जीवदान देणारा 'धन्वंतरी' काळाच्या पडद्याआड! कुदनूर चे 'कृष्णा डॉक्टर' यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2021

हजारो रुग्णांना जीवदान देणारा 'धन्वंतरी' काळाच्या पडद्याआड! कुदनूर चे 'कृष्णा डॉक्टर' यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


कृष्णा डॉक्टर

   हातात छत्री, डोक्यावर फेटा, खाकी हाफ पॅन्ट, तीन बटनांची अंगी असा टिपिकल चंदगडी पेहराव. असाध्य रोगाने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी उन्हातान्हातून कित्येक किलोमीटर अनवाणी चालायचे. ही 'कृष्णा डॉक्टरांची' खासियत होती.
   नुकतेच १३ ऑगस्ट २०२१ रोजी कुदनुर ता. चंदगड येथील राहत्या घरी वयाच्या ९७ व्या वर्षी कृष्णा डॉक्टर यांचे निधन झाले. याबरोबरच सत्तर वर्षांची रुग्णसेवा कायमची खंडित झाली. त्यांचे पूर्ण नाव कृष्णा संताजी कसलकर. निरक्षर असूनही परंपरेने आयुर्वेदिक (गावठी) औषधे देऊन चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातीलच नव्हे तर पुणे, मुंबई कडून येणाऱ्या असाध्य रोगाने ग्रस्त रुग्णांना जीवदान दिल्यामुळे समाजानेच त्यांना 'डॉक्टर' ही पदवी बहाल केली होती. त्यांच्याकडे येणारे ९५ टक्के रुग्ण  'सर्व उपाय' संपल्यावरच यायचे. वयाच्या नव्वदीतही रुग्णसेवेसाठी ते मैलोनमैल पायी प्रवासच करायचे. गेल्या सत्तर वर्षात त्यांनी आयुर्वेदिक काष्ठौषधींचे चुर्ण करण्यासाठी १३ मोठे दगडी खलबत्ते तळाला भोके पडेपर्यंत 'झिजविले' होते. हे अविश्वसनीय असले तरी सत्य आहे. (हा एक जागतिक विक्रम ठरू शकेल). यावरून त्यांच्या रुग्ण संखेची कल्पना येईल. आयुष्यभर अनवाणी चालतच त्यांनी रुग्णसेवा केली. अंथरूणावर खिळलेल्या रुग्णांसाठी ते अनेक वेळा ४०-५० किमी चप्पल नसताना कोणत्याही वाहनाचा वापर न करता पायी चालायचे. हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. औषधोपचारासाठी त्यांची निश्चित फी नव्हती. रुग्ण देईल त्यातच ते समाधान मानायचे. आधुनिक आरोग्य सुविधा नसताना त्यांचे परिसरातील महत्त्व अनन्यसाधारण होते. आपल्या उपचाराने त्यांनी माणसांबरोबर हजारो पाळीव प्राण्यांनाही जीवदान दिले. आधुनिक काळातील डॉक्टर सुद्धा मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे यायचे यातच त्यांचे मोठेपण दडलेले आहे.
   उमेदीच्या काळात कुस्तीसह बैलगाडी ओढणे, ओझे उचलणे अशा स्पर्धा गाजवल्या होत्या. कुळीथ चे शिवलेले पोते पाठीवर घेऊन ते पन्नास बैठका मारायचे. कुस्ती मैदानात पंच म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. एक व्रतस्थ समाजसेवक व कुदनुर गावचे भूषण डॉक्टर कृष्णा यांच्या जाण्यामुळे पंचक्रोशीत समाजसेवा व वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. कृष्णा यांच्या कार्याचा वारसा त्यांचा (बैलगाडी शर्यत प्रेमी) नातू जग्गू पुंडलिक कसलकर चालवत आहे. वैद्यकीय सेवेतील त्यांची ही तिसरी पिढी आहे.
डॉ कृष्णा यांच्या पश्चात पुंडलिक कृष्णा कसलकर व डॉ शांताराम कृष्णा कसलकर (BAMS, धन्वंतरी आयुर्वेदिक क्लीनिक सुळगा- हिंडलगा व शिवाजी नगर बेळगाव) हे दोन चिरंजीव, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार व त्यांच्या औषधोपचारांमुळे दिलासा मिळालेले हजारो हितचिंतक आहेत. या सर्वांच्या वतीने आज दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी दिवस कार्यानिमित्य त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली !!

शब्दांकन :- श्रीकांत वै पाटील, कालकुंद्री. ता. चंदगड


No comments:

Post a Comment