![]() |
चंदगड पंचायत समिती येथे बांधलेल्या डेमो हाऊसचे उद्गाटन करताना आमदार राजेश पाटील, शेजारी सभापती अॅड. कांबळे, सचिन बल्लाळ व इतर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पंतप्रधान आवास योजना या योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल. त्यांना स्वतःचे घर मिळेल. परिणामी समाज सक्षम होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीनीं पंतप्रधान आवास योजनेमध्ये राजकारण न करता गरजूंना लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. चंदगड पंचायत समिती येथे बांधलेल्या पंतप्रधान आवास योजना डेमो हाऊस उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती ॲड. अनंत कांबळे होते.
गटविकास अधिकारी श्री. बोंडरे यांनी प्रास्ताविक केले. आमदार राजेश पाटील पुढे म्हणाले, ``पंतप्रधान आवास योजना या शासकीय योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध होतील. गरिबांना हक्काचा निवारा मिळेल. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चार तारखेला शाळा सुरू होत असून शासनाने दिलेले नियम पाळून व वैयक्तिक रित्या खबरदारी बाळगून शाळा सुरू कराव्यात अशी सूचना केली.`` चंदगड तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी तालुक्यातील गावोगावी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सांगून ते म्हणाले, नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. प्रामाणिक काम करणार्यांच्या मी नेहमी पाठीशी आहे. कोरोणा काळात आरोग्य विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे.
सभापती ॲड अनंत कांबळे म्हणाले, ``पंतप्रधान आवास योजना याबाबत लाभार्थी निवडताना पक्षपातीपणा करू नये. याबाबत आमच्याकडे तक्रारी येतात. गरीब गरजू व्यक्तीं लाभापासून वंचित राहू नये याची सर्वांनी जाणीवपूर्वक काळजी घेण्याची गरज आहे.``
यावेळी कोरोना काळात घेतलेल्या विविध शालेय स्पर्धेतील विजेत्यांना आमदार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, पंचायत समिती सदस्य दयानंद कानेकर, विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील, रूपा खांडेकर, नगराध्यक्ष सौ. प्राची कानेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. संजय चंदगडकर यांनी आभार मानले.
चंदगडची नगरपंचायत स्मार्ट होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज...........
चंदगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. चंदगड नगरपंचायत हे स्मार्ट सिटी प्रमाणे चंदगड नगरपंचायत स्मार्ट व्हावी. यासाठी माझी नेहमी सहकार्य असेल. चंदगड शहर स्मार्ट झाल्यास याचा तालुक्यातील सर्वांनाच फायदा होईल.
कर्नाटकात महाराष्ट्रातील बसेसला असलेली बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील............
कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील बसेसना कर्नाटकात बंदी घातली आहे. त्यामुळे वाहतूक बंद आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. यासाठी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत कर्नाटक सरकारकडे विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment