१८ ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा - कॉ. भरमा कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

१८ ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा - कॉ. भरमा कांबळे

 

लाल बावटा नाव सांगुन बोगस नोंदणी करणाऱ्यांपासुन व अर्थिक लुट करणाऱ्यांपासुन सावध रहा असे आवाहन कॉ. भरमा कांबळे यांनी केले.

 आजरा (प्रतिनिधी )पुंडलिक सुतार

             महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने, बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडीक्लेम योजना तातडीने सुरू करावी, तसेच बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला दहा हजार रुपये दिवाळी भेट द्या व अन्य प्रलंबित मागण्याकरिता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर येथे सोमवार दि १८ आक्टोंबर २०२१ रोजी च्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे यांनी केले.

 ते उत्तुर( ता. आजरा ) श्री लक्ष्मी मंदिर कार्यालय येथे बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ. प्रकाश कुंभार हे होते. 

       कॉ. भरमा कांबळे पुढे म्हणाले,कोविड, महापुर, वाळु उपसाबंदी, महागाई यामुळे बांधकाम कामगार मेटाकुटीला आला आहे. यातुन सावरण्यासाठी व कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी तातडीने येत्या दिवाळीसाठी बांधकाम कामगारांना दिवाळी भेट १० हजार रुपये दिले पाहीजेत. त्यासाठी आक्रमकपणे लढायची तयारी ठेवण्याचे आवाहनही कॉ. कांबळे यांनी केले. 

यावेळी जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम म्हणाले ,तत्कालीन भाजप सरकारने बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाल बावटा संघटनेने कॉंग्रेस आघाडीला सहकार्य केले. परंतु या सरकारने सुद्धा बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष कॉ संदीप सुतार यांनी केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण घेऊन कामगारांना वेठबिगार करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्याला सुद्धा सार्वत्रिक विरोध केला पाहीजे असे आवाहन केले. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना आजरा तालुका अध्यक्ष कॉ प्रकाश कुंभार यांनी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरील मोर्चामध्ये आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातुन किमान सात हजार कामगार भाग घेतील असे अश्वासन दिले. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम, आजरा तालुका अध्यक्ष कॉ प्रकाश कुंभार, राधानगरी तालुका अध्यक्ष कॉ संदीप सुतार, दत्ता कांबळे, शिवाजी कांबळे, अजित मगदूम, संजय चौगुले आदी उपस्थित होते. प्रास्तविक दत्ता कांबळे यांनी केले तर आभार संजय चौगुले यांनी मानले.



No comments:

Post a Comment