चंदगड पंचायत समिती येथे शाळांना वेलकम किटचे वाटप, 'शिक्षणाच्या दवंडी' ची हवा - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2021

चंदगड पंचायत समिती येथे शाळांना वेलकम किटचे वाटप, 'शिक्षणाच्या दवंडी' ची हवा

पंचायत समिती चंदगड येथे मुख्याध्यापकांना वेलकम किटचे वाटप करताना अधिकारी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       उद्या सोमवार दि. ४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवी वर्ग सुरू होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच  लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती चंदगड येथे वेलकम किट चे वाटप करण्यात आले.

        कोरोना महामारी मुळे गेल्या १९ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी भागातील आठवी ते बारावी चे  तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी चे वर्ग अधिकृतरित्या सुरू होणार आहेत. हे वर्ग उद्या पासून सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आदी शैक्षणिक संबंधित घटकांमध्ये एकच लगबग सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या कल्पकतेतून तयार झालेली 'दवंडी शिक्षणाची' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून या दवंडी मुळे वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र आहे. 

         दरम्यान आज पंचायत समिती चंदगड येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पाचवी वरील वर्ग असलेल्या  १०८ जिप. शाळांसाठी मास्क, सॅनिटायझर चा समावेश असलेले 'वेलकम कीट' वितरण करण्यात आले. यावेळी बीआरसी विषय तज्ञ सुनील पाटील, केंद्रप्रमुख वाय के चौधरी, जी बी जगताप, सुधीर मुतकेकर, एन व्ही पाटील आदींची उपस्थिती होती. हे किट उद्या शाळांना वाटप करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment