ढोलगरवाडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य फरार आरोपी ॲड. राजकुमार राजहंस याला मालाडमधून अटक - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2021

ढोलगरवाडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य फरार आरोपी ॲड. राजकुमार राजहंस याला मालाडमधून अटक

ढोलगरवाडी येथील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य फरार आरोपी ॲड.राजकुमार राजहंस सोबत मुंबई पोलीस पथक
नंदकुमार ढेरे - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य फरार आरोपी ॲड. राजकुमार अर्जूनराव  राजहंस  याला मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड परिसरातून अटक केली. ढोलगरवाडी एका पोल्ट्री वजा फार्महाऊसवर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी ॲड. राजकुमार राजहंस हा फरार होता. मुंबई पोलीसांनी अखेर सापळा रचून त्याला अटक केली. दरम्यान या आधी मुंबईत ख्रिस्तिना उर्फ आयेशा हिला आणि चंदगडमधील ढोलगरवाडी गावात असणाऱ्या फार्महाऊसचा केअरटेकर निखिल लोहारला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे एका फार्म हाऊसमध्ये ॲड. राजकुमार राजहंसने सुरू केलेला एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांच्या अमंली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला आहे. कुक्कुटपालन आणि शेळीपालन करत असल्याचा आभास निर्माण करत हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. या कारवाईत ड्रग्ज आणि कच्चा माल असा एकूण २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. राजकुमार राजहंस 

         या हायप्रोफाईल प्रकरणाचे मुंबई ते ढोलगरवाडी कनेक्शन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्य संशयित अ‍ॅड. राजकुमार अर्जुनराव राजहंस (वय वर्ष -५१) हा मूळचा ढोलगरवाडीचा असून, सध्या त्याचे वास्तव्य मुंबईत आहे. ढोलगरवाडीत मेफिड्रीन (एमडी) ड्रग्जचे उत्पादन करून मुंबईसह राज्यभर या ड्रग्जची तो विक्री करत असल्याचे मुंबई पोलिसांच्या अमंली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईत उघड झाले आहे. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी इतर संशयित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. 

 सिमरनच्या अटकेने उद्ध्वस्त केला ढोलगरवाडीतील ड्रग्जचा कारखाना....!

        अमंली पदार्थविरोधी विभागाच्या वांद्रे कक्षाने १२ नोव्हेंबरला साकीनाका, खैरानी रोड येथे सापळा रचून क्रिस्टीना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन हिला ताब्यात घेतले. तिच्याजवळ ५ लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. हे ड्रग्ज एका व्यक्तीने आपल्याला दिले असून, तसेच हे ड्रग्ज कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात असलेल्या ढोलगरवाडीतील एका कारखान्यामध्ये बनवले जात असल्याची माहिती तिने पोलिस चौकशीत दिली होती. त्यानुसार मुंबई पोलीसानी तपासाची दिशा ठरवून अत्यंत गुप्तपणे चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत मुंबई पोलिसांच्या पथकाने चंदगड पोलिसांच्या मदतीने ढोलगरवाडीमधील त्या फार्महाऊसवर छापा टाकला असता १२३ ग्रॅम एमडी आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा ३८ किलो ७०० ग्रॅम कच्चा माल हाती लागला. केमिकल, काचेची उपकरणे, ड्रायर आणि अन्य साहित्य असा एकूण २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत पोलिसांनी फार्म हाऊस सील केले. मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अप्पर आयुक्त वीरेश प्रभू, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, पोलिस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा युनिटचे प्र. पो. नि. संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पो. नि. लता सुतार, दहिफळे, सपोनि वाहिद पठाण, सिद्धराम म्हेत्रे, फरिद खान, सुरेश भोये व सहकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment