शिनोळी येथे ऑनलाईन जुगार अड्यावर छापा, बेळगावातील सहा जणावर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

शिनोळी येथे ऑनलाईन जुगार अड्यावर छापा, बेळगावातील सहा जणावर गुन्हा दाखल

तेऊरवाडी (एस. के. पाटील)

           शिनोळी (ता. चंदगड) येथे चंदगड पोलिसांनी छापा  मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले.

           यामध्ये  विजय बळवंत माने (रा. विजयनगर हिंडलगा), इरषाद मुगुटसाब मजगाव (लक्ष्मीनगर काकती), समीर मुस्तफा पाशा (वडगाव विष्णू गल्ली), आशीफ आब्बास अली बागवान (लक्ष्मीनगर काकती), रमेश यलाप्पा चौगुले (खादरवाडी) व विश्वनाथ वरपे (विजयनगर हिंडलगा) अशा सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर साहित्य मिळून २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

        मिळालेल्या माहितीनुसार, शिनोळी फाटा ते शिनोळी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्समध्ये बालाजी ऑनलाईन लॉटरी या नावाने बिगरपरवाना हा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणातील संशयित विजय बळवंत माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जागा मालक विश्वनाथ वरपे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. फौजदार एच. एस. नाईक करत आहेत.


          *बेळगाव सिमाभागातून शिनोळी येथे जुगाराचा अड्डा* 

          शिनोळी येथे चालणारा जुगार हा मुख्यतः बेळगाव सिमाभागातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सुरु असून त्यातून मोठ्या प्रामाणात जुगाराचा बाजार भरला आहे. वारंवार पोलिस या ठिकाणी कारवाई करत असतात. पण येथील जुगार कायम स्वरुपी संपविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. काही वर्षापूर्वी येथे जुगाऱ्यांसाठी खास अँम्बुलन्सचा वापर केला होता. कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असून त्याचा चंदगड तालुक्यात सुळसुळाट झाला आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी ठिकाणी हा जुगाराचा अड्डा झाल्याने तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर वचक बसवून आणखी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment