कळसगादे गावालगतची विक्रीला काढलेली जमीन ग्रामस्थांना देण्याची मागणी - ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2021

कळसगादे गावालगतची विक्रीला काढलेली जमीन ग्रामस्थांना देण्याची मागणी - ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कळसगादे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कळसगादे (ता. चंदगड) येथील गावालगत गट नं. ११७ व ११८ या जमिनीचे मालक  शरद यशवंत आरेकर व शैला उदयसिंग मिसाळ आहेत. जमीन मालकांनी ही जमीन विक्रीला काढली असून ती जमीन सर्व ग्रामस्थ सरकारी नियमानुसार होणारी किंमत आदा करुन गावासाठी हि जमीन घेण्यास सक्षम आहोत. त्यामुळे हि जमीन कळसगादे ग्रामस्थांना मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

          ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, सदर जमिन ही त्यांना सरकारी बक्षिस पत्र म्हणून मिळाली होती. तरी आतापर्यंत मालकांची गेली ४० ते ४५ वर्षे त्या जमिनीमध्ये वहिवाट व कसवणूक होत नाही. सदर जमिनीमध्ये कळसगादे ग्रामस्थ पिके घेण्यासाठी व गुरे चारण्यासाठी त्याचा वापर करत होते. आज अखेर ती जमीन पडीक आहे. खातेदारांची परिस्थीती ही चांगली आहे,  फक्त जाणूनबुजून औषधोपचार व आजारपण यांचे कारण पुढे करून सदरची सरकारी मालमत्ता विक्रीला काढलेली आहे. गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जमीन गावालगत असल्यामुळे त्या जमिनीची सरकारी नियमावलीनुसार जमीन विक्री होत असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ सरकारी नियमानुसार होणारी किंमत आदा करणेस तयार आहोत. कारण कळसगादे ग्रामस्थांना सदर जागेव्यतिरिक्त दुस-या ठिकाणी विस्थापिकरण होणार नसल्यामुळे सदरील जागेच्या खरेदीची फेरचौकशी होवून ही जागा कळसगादे ग्रामस्थांना मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment