पारगड किल्ल्यावर जाणाऱ्या धोकादायक रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करा -ग्रामस्थ व पर्यटकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2022

पारगड किल्ल्यावर जाणाऱ्या धोकादायक रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करा -ग्रामस्थ व पर्यटकांची मागणी

पारगड किल्ल्यावर जाणारा घोडे दरवाजा नजीकचा धोकादायक वळण रस्ता.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     ऐतिहासिक किल्ले पारगड पाहण्यासाठी शिवप्रेमी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि घोडे दरवाजा मार्गे किल्ल्यावर जाणारा अरुंद व वळणावळणांचा रस्ता पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी किल्ले पारगड ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.

किल्ल्याच्या तटबंदी नजीकच्या अरुंद रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

     वीस वर्षांपूर्वी गडावरील भगवती- भवानी मंदिराचा जीर्णोद्धार झाला. यावेळी इमारतीचे साहित्य नेण्यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. गडाच्या पायऱ्या ते घोडे दरवाजा मार्गे भवानी मंदिर पर्यंत रस्त्याची लांबी सुमारे एक किलोमीटर इतकी आहे. वीस वर्षांपूर्वी केलेल्या या रस्त्याची त्यानंतर कोणतीच डागडुजी झाली नाही. घोडे दरवाजा लगत धोकादायक वळणांचा रस्ता दोन तीन वेळा दुरुस्ती केला असला तरी ठेकेदारांच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे केवळ सहा महिन्यातच रस्त्याची जैसे थे स्थिती होत आहे. सध्या पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास वादाचे तसेच धोक्याचे प्रसंग नित्याचे झाले आहेत. याचा विचार करून वनविभाग व शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. रुंदीकरण करत असताना किल्ल्याच्या तटा कडील बाजूने न करता दरीकडील बाजूने करावे असे येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी सुचवले असून हे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment