माऊलींच्या अश्व रिंगणाने तुर्केवाडीतील उत्सवाची सांगता, शताब्दी महोत्सवी पारायण सोहळा व वास्तुशांत सोहळा लाखोंच्या उपस्थितीत संपन्न, सात दिवस सांप्रदायाची मेजवानी - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2022

माऊलींच्या अश्व रिंगणाने तुर्केवाडीतील उत्सवाची सांगता, शताब्दी महोत्सवी पारायण सोहळा व वास्तुशांत सोहळा लाखोंच्या उपस्थितीत संपन्न, सात दिवस सांप्रदायाची मेजवानी

तुर्केवाडी येथील माऊलीचा अश्वरिंगण सोहळा.

निवृत्ती हारकारे - कार्वे / सी. एल. वृत्तसेवा

          तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत ब्रह्मलिंग मंदिरचा वास्तुशांत कळसारोहण सोहळा व संत श्रेष्ठ सोपान देव पुण्यतिथी चा शताब्दी महोत्सव कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात पहिल्या दोन दिवसात वास्तुशांत व कलशारोहण कार्यक्रम करण्यात आला. कळसारोहण कार्यक्रमासाठी कलश मिरवणूक तुर्केवाडी, यशवंतनगर, वैताकवाडी, मजरे कार्वे व मुरकुटेवाडीतुन काढण्यात आली. या मिरवणुकीत तालुक्यातील विविध गावातील सांप्रदायातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परमपूज्य चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी( हुक्केरी हिरेमठ )यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण सोहळा करण्यात आला. त्यादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किमान पस्तीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 

       सोमवार दिनांक 27 डिसेंबर 2021 पासून सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार यांना चिंतन सेवेसाठी आमंत्रित करण्यात आले होते सोम. 27 रोजी गुरुवर्य गोपाळअण्णा वास्कर महाराज पंढरपूर यांच्या निरूपणाने व आनंदराव पाटील मळगेकर यांच्या प्रवचन सेवेने या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. गोपाळ आण्णा वास्कर यांनी आपल्या निरुपण सेवेमध्ये ।।सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे।।हा संत तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन चिंतन सेवेस प्रारंभ केला. व तुकाराम महाराजांचे अभंग रुपी तत्त्वज्ञान श्रोत्यांसमोर  मांडले.

           मंगळ. दिनांक 28 रोजी देहू येथील गाथा मंदिर संस्थानाचे अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंग घुले महाराज यांच्या निरूपण सेवेने तर या महोत्सवाची कीर्ती वाढविली ।।काय नोहे केले एका चिंतीता विठ्ठले।सर्व साधनांचे सार भवसिंधु उत्तरी पार।।या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे अभंगाचे चिंतन  घेतले. या अभंगाचा सार मांडताना घुले महाराज यांनी अतिशय सोप्या भाषेत प्रमाणबद्ध अभंगाची रचना श्रोत्यांसमोर घेऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बुध. दिनांक 29 रोजी गुरुवर्य जयवंत बोधले महाराज पंढरपुर यांच्या निरुपणा ची सेवा संपन्न झाली.।। किर्तन चांग किर्तन चांग। वय अंग हरिरूप।। प्रेमे छंदे नाचे डोळे। हरपले देहभान।। या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाने कीर्तन सेवेचे निरूपण श्रोत्यांसमोर ठेवले. 

            गुरुवार दिनांक 23 रोजी कोगनोळी चे पूर्णानंद काजवे महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा ।।रवि दिप हिरा दाविती देखणे। अदृश्य दर्शने संताचेनी।। या सुप्रसिद्ध अभंगावर निरूपण केले. अगदी ग्रामीण शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर रोजी संत एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी।। हरी प्राप्तीसी उपाय l धरावे संतांचे पाय। तेणे साधती साधने l तुटती भवाची बंधने।। या एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे चिंतन मांडताना उपस्थित श्रोत्यांना तत्त्वज्ञान दिले. 

             शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी प. पु. वै. धुंडा महाराज देगलूरकर यांचे वंशज चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांनी निरूपण ची सेवा केली. त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ।।आता तुम्ही कृपावंत, साधुसंत जिवलग। गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी।। या सर्वपरिचित अभंगावर चिंतन सांगितले. संत तुकाराम महाराजांनी भगवंताकडे केलेली मागणी या मागणीत आता या शब्दाला काय महत्त्व हे सांगून गोमटे करा अशी विनवणी केली याचे अगदी सोप्या भाषेत विवेचन श्रोत्यांसमोर मांडून दोन ते अडीच तास श्रोत्यांना मंत्रमुग करून श्रोत्यांनाच चिंतन करण्यास भाग पाडले. रविवार दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजता अवचितवाडी येथील पांडुरंग उपलानी महाराज यांच्या काला कीर्तनाने या निरुपणाची सेवा समाप्त झाली. 

         या दरम्यान दररोज सायंकाळी विविध वक्ते यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. एकंदरीत सात दिवसांच्या या सोहळ्यात या परिसरातील नागरिकांना एक पर्वणीच मिळाली. रविवारी सकाळी 11 वाजता तुर्केवाडी फाटा येथे जगद्गुरु संत माऊली अश्व रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अश्व रिंगण सोहळ्यास चंदगड ,बेळगाव, खानापूर सह लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. या ठिकाणाहून आबालवृद्धांनी हे रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी एक वाजता शताब्दी महोत्सवाच्या महाप्रसादाचा प्रारंभ झाला. 

           महाप्रसाद सायंकाळपर्यंत सुरू होता. किमान पन्नास ते साठ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे  बोलले जात आहे. हा उत्सव म्हणजे।याची देही याची डोळा। अनुभवावयास मिळाला. अत्यंत अभूतपूर्व व उत्साही वातावरणात हा अद्भुत सोहळा संपन्न झाला. तुर्केवाडी सह माडवळे, तडशिनहाळ, मुरकुटेवाडी, म कार्वे, यशवंतनगर व वैताकवाडी येथील ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. रात्री दिंडीने या उत्सवाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment